ठाणे : ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा पट वाढविणे आणि त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याऐवजी आता त्यांना बसण्यासाठी आता थेट दिल्लीच्या धर्तीवर तब्बल ७२५७ रुपयांचा एक बेंच खरेदी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. असे तब्बल १४०० बेचेंस खरेदी केले जाणार असून यासाठी १ कोटी १ लाख ५९ हजार ८०० रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
महापालिकेच्या डिजिटल वर्गखोल्यांसाठी हा बेचेंस खरेदी करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. १९ डिसेंबरच्या महासभेत तो मंजुरीसाठी ठेवला आहे. यंदाच्या वर्षात पहिली ते दहावीच्या १०४ शाळांमधील दोनशे वर्गखोल्या डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्गखोल्यांमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रस्ताव आहे. हे बेंचेस दिल्लीतून घेतले जाणार आहेत. विविध कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत या एका बेंचेसवर किमान ७२५७ रु पये खर्च केला जाणार आहे. हा खर्च केवळ पहिल्या टप्प्यातील बेंचेसचा असून पुढील काळात यावर कोट्यवधी रु पये खर्च करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली असल्याची माहिती पुढे येत आहे.
सुविधा नसताना बेंचेसचा अट्टाहास कशासाठी?
आजघडीला महापालिकाच्या शाळांमध्ये सुमारे ३५ हजार विद्यार्थी बालवाडी ते इयत्ता दहावी दरम्यान शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांना मुलभूत सोयीसुविधा निटशा मिळत नाहीत, असे असतांना हा नवा अट्टाहास कशासाठी असा सवाल केला जाऊ लागला आहे. यापूर्वीदेखील शिक्षण विभागाचे असेच खर्चाचे प्रस्ताव वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुलांसाठी हे चांगले बेंचेस असून ते फायबरचे आहेत. ते खराब होणारे नाहीत, त्यामुळे यापूर्वी दुरुस्तीसाठी जो खर्च होत होता, तोदेखील कमी होणार आहे.- विकास रेपाळे शिक्षण मंडळ - सभापती