ठाणे : येत्या सोमवार पासून ठाणे शहरातील शाळा सुरु होणार आहेत. परंतु मागील जवळ जवळ दीड वर्ष शाळा बंद होत्या. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे योग्य प्रकारे स्वागत करावे अशा सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी संबधित विभागाला व त्या त्या प्रभागातील नगरसेवकांना दिल्या आहेत. तसेच शनिवारी त्यांनी शहरातील काही शाळांची पाहणी केली, या पाहणीत साफसफाई न दिसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी देखील केली.
कोरोना सुरू झाल्यापासून गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा या बंद आहेत, सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आठवी ते दहावीचे वर्ग सोमवार पासून सुरु होत आहेत. याबाबत दोन दिवसांपूर्वी महापौर नरेश म्हस्के यांनी शिक्षण विभागासोबत बैठक घेऊन तातडीने शाळांची साफसफाई करण्याचे आदेश दिले होते, याचा आढावा घेण्यासाठी शनिवारी महापौरांनी खोपट येथील शाळेस भेट दिली.
दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने संपूर्ण शाळेचे आवार साफ करण्याच्या सूचना म्हस्के यांनी तात्काळ घनकचरा विभागाला यावेळी दिल्या. दरम्यान शाळांची साफसफाई झाली नसल्याचे त्यांच्या पाहणीत येताच, त्यांनी संबधित अधिकाऱ्याची कान उघाडणी करीत साफसफाई योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्या. ठाणे महापालिकेच्या विविध प्रभागात महापालिकेच्या शाळा असून त्या त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवकांनी शाळांची पाहणी करावी. तसेच सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जावून मुलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांचे शाळेत स्वागत करावे, असे आवाहन म्हस्के यांनी सर्व नगरसेवकांना केले आहे.