ठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधनामहाविद्यालयाच्या विद्यार्थी समितीच्यावतीने योग्य सामाजिक अंतराच्या या युगात 'विविध कलागुणांचे अनुसरण' या उद्देशाने *"द क्विंटेट ऑफ आर्टिस्ट्री"*( कलात्मक पंचकडी ) या नावाने पाचदिवसीय कलात्मक वेबिनारचे आयोजन दि.२८ जुलै २०२० ते १ ऑगस्ट २०२० या कालावधीत करण्यात आले आहे. जुलै महिन्यात गुरूपौर्णिमा हा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांमधून देशाचे जबाबदार नागरिक घडवू पाहणाऱ्या, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने झटणाऱ्या सर्व गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी "कलात्मक पंचकडी"(Quintet of Artistry) हा आंतरराष्ट्रीय उपक्रम साकारला आहे.
कलात्मक आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या माध्यमातून आपल्या प्रिय प्राध्यापकांसाठी, तसेच विश्वातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे. या वेबिनारमध्ये व्हिडिओ मेकिंग, व्यक्तिमत्त्व सौंदर्य, पाककला, मनोरंजन, गाणे, अभिनय, नृत्य अशा अनेक कलागुणांनी भरलेल्या सत्रांचा समावेश आहे, जे खरोखर आपल्या सर्वांसाठी आनंददायक असेल. या उपक्रमासाठी भारतातीलच नव्हे, तर नेपाळ, युके, कुवैत, भूतान, सौदी अरेबिया, हाँगकाँग या राष्ट्रांतील असंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी नावनोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी दिली. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून झी टेलिफिल्म्सच्या ऑपरेशन हेड सोजल सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटकाळात आपल्या कुटुंबियांबरोबरच आपल्याला सामाजिक एकात्मतेचेही महत्त्व पटले आहे.नैराश्याच्या या काळात स.प्र.ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विश्वातील सर्व शिक्षक-विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीवेने साकारलेला हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे, या विद्यार्थ्यांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा देते असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर मनोरंजनाचे क्षेत्र माझ्यासाठी पुर्णपणे नवे असतानाही मी मिळालेल्या प्रत्येक संधीचा सकारात्मक उपयोग केला, माझा आजवरचा प्रवास आव्हानात्मक होता, पण मी पुढे उभ्या ठाकलेल्या प्रत्येक आव्हानांमध्ये मला गवसलेल्या संधीचा यशस्वी मागोवा घेतला. आजवरच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर, वळणावर सतत योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचे मी या कार्यक्रमानिमित्त स्मरण करते,असे त्या म्हणाल्या.
उद्घाटनानंतर नॉलेज ब्रिज या संस्थेतील कार्यक्रम प्रशिक्षक भूषण सावंत यांनी 'व्हिडीओ गॅरेज' हा विषय मांडताना व्हिडीओ व अॉडीयोचे सर्व घटक सविस्तरपणे मांडले. व्हिडीओ बनविण्याच्या काही सोप्या पद्धती त्यांनी समजावून सांगितल्या. आपल्या मोबाईलवरील काही सेटिंग वापरून व्यावसायिकदृष्ट्या उत्कृष्ट व्हिडिओ सहजपणे बनवता येतात, त्यासंदर्भात महाजालावर सहजपणे विनामूल्य उपलब्ध असलेल्या लेक्सिस अॉडीओ एडीटर, सिनेमा एफ 5, ओपन कॕमेरा अॕडॉसिटी या अॕप्सची परीपूर्ण माहिती दिली.काईनमास्टर,पॉवर डायरेक्टर या अॕप्सच्या साहाय्याने व्हिडीओ एडीटींग कसे करावे ते प्रात्याक्षिकांच्या साहाय्याने समजावले. पीपीटी सादरीकरणाला स्क्रीन रेकॉर्डींग अॕपच्या मदतीने आकर्षक व्हिडीओचे रूप देता येते, एकही सबस्क्रायबर नसतानाही स्ट्रीमलॕब्स या अॕपचा मदतीने यु-ट्युब वर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करता येते अशा अनेक अज्ञात बाबींची माहिती या सत्रात शिक्षक-विद्यार्थ्यांना मिळाली. आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण सूत्रे विद्यार्थ्यांनी सांभाळली. हा कार्यक्रम देश-विदेशातील तब्बल ३००० पेक्षा जास्त लोकांनी लाईव्ह पाहिला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ज्ञानसाधनाचे माजी विद्यार्थी पंकज पितळे व भटू सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.महाविद्यालयात शिक्षण घेताना मिळालेली संस्कारांची अमुल्य शिदोरी जीवनात प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडत असल्याचे थोरॉन टर्नकी सोल्युशन्स् प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पंकज पितळे यांनी मांडले. तर समर्थ व्यासपीठ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तरूण भारत वृत्तपत्राचे वार्ताहर व गरीब विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिली सिग्नल शाळा उभारणारे भटू सावंत यांनी जीवनात मिळालेल्या यशामागे महाविद्यालयात आत्मसात केलेली जीवनमूल्ये आहेत असे मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेचे सतीश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव कमलेश प्रधान व व्यवस्थापन सदस्या मानसी प्रधान अनेकविध उदात्त शैक्षणिक उपक्रम राबवत असल्याचे ते म्हणाले.