ठाणे : महापालिका शाळेतील विद्यार्थांना टॅब मिळाले नसल्याचे प्रकरण मागील महासभेत गाजल्यानंतर आता ते देण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अजून तीन महिने तरी ते विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष संपल्यावर आणि परीक्षा तोंडावर असताना मुलांच्या हाती हे टॅब पडतील. त्यामुळे आश्वासन पूर्ण होईल, पण त्याचा मुलांना कितपत उपयोग होईल, असा नवा पेच सत्ताधाऱ्यांना पडला आहे.ठाणे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब मिळावेत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. यासाठी अंदाजपत्रकात तरतूदही केली होती. परंतु, तरीदेखील अद्यापही विद्यार्थ्यांच्या हाती ते का पडले नाहीत, असा सवाल उपस्थित करुन शिवसेनेच्या नगरसेवकाने महापौरांनाच घरचा आहेर दिला होता. त्यानंतर लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या हाती टॅब दिले जातील असे आश्वासन शिक्षण विभागाने दिली होते. दरम्यान, ज्या वेळेस या संदर्भातील प्रस्ताव मंजूर केला होता. त्यावेळेस एकाच वेळेस पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती, टॅब देण्याचे निश्चित केले होते. परंतु, आता पहिल्या टप्यात सातवी आणि आठवीच्याच विद्यार्थ्यांच्या हाती ते दिले जातील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. त्यानुसार याची प्रक्रिया सुरु झाली असून पुढील तीन महिन्यात ते विद्यार्थ्यांच्या हाती दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यंदाचे शैक्षणिक वर्ष संपण्यास केवळ चार महिन्यांचाच अवधी शिल्लक राहिल्याने हे टॅब पुढील शैक्षणिक वर्षात हातात पडतील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. आजघडीला पाचवी ते दहावी पर्यंतच्या वर्गात एकूण १३ हजार ६३७ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १२ हजार २३८ आणि हिंदी माध्यमाच्या १३९९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. > या टॅबमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमाचा पूर्ण पुस्तकांचा अभ्यासक्रमांचा अंतर्भाव असणार आहे. विद्यार्थ्यांना हसळ खेळत आणि कार्टुन्स तसेच चित्रफीतीच्या माध्यमातून प्रत्येक धडा शिकविला जाणार आहे. एखादा विषय समजत नसल्यास त्याची व्यवस्थित कमांड दिल्यावर त्या विषयातील संपूर्ण बारकावे स्पष्ट होणार आहेत. परीक्षा घेण्याचाही यात अंतर्भाव असणार आहे. यामुळे विद्यार्थ्याची गुणवत्तादेखील पालकांना समजणार आहे. प्रश्नांच्या समोर उत्तरांचेदेखील पर्याय यामध्ये उपलब्ध असणार आहेत. तसेच पास होऊन जाणाऱ्या विद्यार्थ्याला पुढील वर्गाचा अभ्यासक्रमदेखील एसडी कार्डद्वारे लोड करुन दिला जाणार आहे.
शैक्षणिक वर्ष संपल्यावर विद्यार्थ्यांना टॅब मिळणार!
By admin | Published: December 09, 2015 12:45 AM