- शशिकांत ठाकूरकासा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सात ते आठ महिने शाळा आणि कॉलेजेस बंद होती. त्यामुळे यंदा चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा झाल्याच नाहीत. त्यामुळे यंदा दहावीच्या मुलांना सवलतीचे गुण मिळणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.दरवर्षी या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कलही या परीक्षेकडे जास्त असतो. रेखाकला परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण ५० टक्केच्या जवळपास आहे, मात्र ‘ए’ ग्रेड मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असते. परीक्षेत ‘ए’ ग्रेडसाठी ७ गुण, ‘बी’ ग्रेडसाठी ५ गुण आणि ‘सी’ ग्रेडसाठी ३ गुण दिले जातात, मात्र यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ‘ए’ ग्रेड ४ ते ५ टक्के प्रमाण, तर ‘बी’ ग्रेड १५ ते २० टक्के आणि उर्वरित ७५ ते ८० टक्के विद्यार्थ्यांना ‘सी’ ग्रेड मिळतो. त्यामुळे रेखाकला परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण टक्केवारी वाढण्यास मदत होते. दरम्यान, ड्रॉईंगच्या परीक्षा या दरवर्षी सप्टेंबरमध्ये होतात. यामध्ये दोन परीक्षा होत असून पहिली एलिमेंटरी आणि दुसरी इंटरमिजिएट परीक्षा होते. विद्यार्थ्यांना गुण हे दुसरी इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दिले जात असले तरी पहिली एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दुसऱ्या इंटरमिजिएट परीक्षेस बसू शकतात. रेखाकला परीक्षेत स्थिरचित्र, स्मरणचित्र, नक्षीकाम चित्र आणि भौमितिक रचना असे चार विषय असतात. दररोज दोन पेपरप्रमाणे दोन दिवस चालणाऱ्या या परीक्षेचा निकाल जानेवारीत लागतो, मात्र कोरोनामुळे मागील वर्षापासून या परीक्षा झाल्याच नाहीत. त्यामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना रेखाकला परीक्षेचे सवलतीचे गुण मिळणार नाहीत.कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षापासून दोन वर्षे रेखाकला परीक्षा झालीच नाही. त्यामुळे या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत शासन स्तरावर विचार होणे आवश्यक आहे.- महेंद्र पवार, कार्याध्यक्ष, जिल्हा कला अध्यापक संघ, पालघरकोरोनामुळे गेल्या वर्षी व यंदाही रेखाकला परीक्षा झालीच नाही. त्यामुळे आमचे सवलतीचे गुण जाणार आहेत.- प्रणय चौरे, विद्यार्थी
विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत रेखाकलेच्या सवलतीचे गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:43 AM