लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील स्टेशनसमोरील विष्णूनगर पोलीस ठाणे आनंदनगर, ठाकूरवाडी येथील इमारतीत चार वर्षांपूर्वीच स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे पडून असलेल्या जुन्या जागेत सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्यासाठी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून, या जागेत अभ्यासिका उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
म्हात्रे यांनी मंगळवारी या कामाची पाहणी केली. यावेळी डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख सुभाष मुंदडा, शिवसेनेचे आशुतोष येवले, अभियंता महेश गुप्ते, आदी उपस्थित होते. आनंदनगर-ठाकूरवाडी येथील जागा सर्व समावेशक आरक्षणांतर्गत वाचनालय व अभ्यासिकेसाठी आरक्षित होती. त्या जागेत अभ्यासिका सुरू करावी, असा आग्रह म्हात्रे यांनी २०१६ मध्ये धरला होता. मात्र, तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महापालिकेमार्फत तेथे विष्णूनगर पोलीस ठाणे स्थलांतरित केले. त्यामुळे अभ्यासिकेचा विषय बारगळला. त्यावेळी अभ्यासिकेसाठी महापालिकेने २५ लाखांचा निधी मंजूर केला होता.
जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर डोंबिवली ग्रंथसंग्रहालय आहे; तर पहिल्या मजल्यावरील अडीच हजार चौरस फुटांच्या जागेत अभ्यासिका सुरू करण्यासाठी म्हात्रे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या जागेत अभ्यासिका उभी राहत असून, त्या कामाला सुरुवात झाली आहे. महापालिकेने त्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या जागेत एकाच वेळी १०० विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेऊ शकतील, असे म्हात्रे म्हणाले.
अशी असेल सुसज्ज अभ्यासिका
अभ्यासिका वातानुकूलित असेल. त्यात ई-लायब्ररीची सोय असेल. अभ्यासिका स्टेशन परिसरात असल्याने बाहेरील वाहनांच्या आणि रहदारीच्या आवाजाने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी अभ्यासिका साउंडप्रूफ असणार आहे. विद्यार्थ्यांना जेवणासाठी वेगळी व्यवस्था केली जाणार असून, तेथे ते डबा खाऊ शकतील.
----------