आसनगाव : आसनगाव येथे विकास केदारे व त्यांची अकरा वर्षांची मुलगी आर्या हिने १५ मार्चला घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. एस. क्षीरसागर यांच्या त्रासाला कंटाळून केल्याचे केदारे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. विकासची बहीण शिल्पा शिरसाट यांच्या तक्रारीवरून बुधवारी सायंकाळी शहापूर पोलिसांनी क्षीरसागर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
केदारे यांची पत्नी माेनालीने सात महिन्यांपूर्वी आत्महत्या केली हाेती. या गुन्ह्यात विकास आणि त्यांच्या आईवर गुन्हा दाखल झाला हाेता. विकास हा काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला हाेता. त्यानंतर ते उल्हासनगरमध्ये बहिणीच्या घरी राहत हाेते. १५ मार्चला ते मुलीसह आसनगाव येथील घरी आले व तेथे दाेघांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी पाेलीस उपनिरीक्षक क्षीरसागर यांना जबाबदार धरले हाेते. पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांनी तपास करून शिल्पा शिरसाट यांच्या तक्रारीवरून क्षीरसागर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.