डोंबिवली - जुना मुंबई ते पुणे रोड म्हणून ओळखला जाणारा मुंब्रा बायपास, तसेच शिळ महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते. या महामार्गावरील कल्याणफाटा व शिळफाटा जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आज नागपूर अधिवेशनात माजी आमदार सुभाष भोईर यांनी शिळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या महामार्गावरून जे.एन.पी.टी. बंदरातून दररोज सुमारे वीस ते पंचवीस हजार कंटेनर, अवजड वाहने नाशिक, गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये येत- जात असल्यामुळे वाहतूक कोंडीचा अत्यंत त्रास सहन करावा लागतो. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा एकमेव महामार्ग आहे. या महामार्गावर अपघात झाल्यास अनेक वेळा या माहामार्गावर तासंतास वाहने उभी करून वाहन चालकांना तसेच प्रवाशांना रस्त्यात अडकून पडावे लागते त्यामुळे छोट्या वाहनांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागतात. तसेच वाहतूक कोंडीचा त्रास नोकरदार, व्यावसायिक तसेच वाहन चालकांना होत आहे.याच महामार्गावरून नवी मुंबईकडे लहान मोठी व अवजड वाहने सतत ये- जा करीत असतात. सद्य स्थितीत नवीमुंबईकडे जाण्यासाठी शिळ- म्हापे हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे प्रवाशांनाफारचत्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंब्रा वाय जंक्शन येथे व कल्याण फाटा जंक्शन येथे उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे एमएमआरडीएमार्फत ऐरोली काटई या भुयारी मार्ग व रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. याकरिता शिळफाटा येथे उड्डाणपुल उभारल्यास मुंब्रा बायपास जंक्शन ते कल्याणफाटा जंक्शन या दरम्यान अवजड वाहतूक सुरळीत होवून ती उड्डाणपुलामार्गे निघून जाईल व या संपूर्ण परिसरात राहणाऱ्या लोकांकरिता खालील सेवारस्ते वाहतुकीस मोकळे होतील व या संपूर्ण परिसरातील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. त्यामुळे शिळ फाटा येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून काम सुरु करण्याची मागणी भोईर यांनी पत्राद्वारे केली आहे. भारत गिअर्स ते एरोली भुयारी मार्गास गती द्यावी जुना मुंबई - पुणे महामार्गावरून नवी मुंबईकडे लहान मोठी व अवजड वाहने सतत ये- जा करीत असतात. सद्य स्थितीत नवी मुंबईकडे जाण्यासाठी शिळ- म्हापे हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे प्रवाशांना फारच त्रास सहन करावा लागतो. त्याकरिता नवी मुंबई व मुंबईला जोडणाऱ्या सर्वात जवळचा रस्ता तयार करण्यासाठी एमएमआरडीए ने प्रस्तावित केलेला भारत गिअर्स ते एरोली भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे त्यासाठी एमएमआरडीए मार्फत २३७ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र सदरचे काम संथ गतीने होत असल्यामुळे निर्धारित वेळेत भुयारी मार्ग पूर्ण होणार नाही. याकरिता भारत गियर्स ते ऐरोली भुयारी मार्गास गती देण्याची मागणी भोईर यांनी ठाकरे यांच्याकडे केली.
शिळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याची सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 4:57 PM