ठाणे : मुंबईत होर्डींग्ज पडून झालेल्या दुर्घटनेनंतर आता ठाणे महापालिकेला जाग आली आहे. त्यानुसार ठाण्यात अशा प्रकारची हानी होऊ नये या दृष्टीने बुधवारी महापालिकेच्या माध्यमातून ठाण्यातील जाहीरातदारांची (होर्डींग्ज) बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुढील आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. तसेच होर्डींग्ज बाबत जी नियमावली ठरवून देण्यात आली आहे. त्याचे पालन करण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोडे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ३०० च्या आसपास होर्डींग्ज आहेत. परंतु ९० ठिकाणी दिलेल्या परवानगी पेक्षा अधिकच्या आकाराचे म्हणजेच ओव्हरसाईज होर्डींग्ज उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात मुंबईत घडलेल्या घटनेनंतर आता महापालिकेला जाग आली आहे. त्यानुसार ज्या ज्या जाहीरादारांनी ओव्हरसाईज होर्डींग्ज उभारले आहे. त्यांनी ते आठ दिवसाच्या आत नियमात आणावे अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यापूर्वी देखील स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात आले आहे. परंतु आता पुन्हा पुढील आठ दिवसात ऑडिट अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय जाहीरात धोरणातील नियमांचे पालन करावे अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
काय आहे जाहीरात धोरणठाणे महानगरपालिकेच्यावतीने २००३ च्या शासन जाहिरात धोरणानुसार जाहिरातफलक उभारणीस परवानगी देण्यात येते. यापुढे जाहिरातफलक लावण्यासाठी परवानगी देताना शहराच्या सौंदर्यास बाधा येणार नाही अशा पद्धतीने परवानगी देणे, किती क्षेत्रफळामध्ये आणि किती आकाराचे होर्डींग उभा करता येईल, किती अंतरावर परवानगी देता येईल याबरोबरच न्यायालयाच्या निदेर्शांचे पालन करणे, नागरिकांच्या दृष्टीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे असे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले आहे.होर्डींग्ज बाबत नियमावलीहोर्डींग्ज बाबत पालिका प्रशासनाच्या नियमावलीमध्ये २० फुटापर्यंत होर्डींग्ज असावे, रस्त्याच्या अथवा फुटपाथच्या कडेला रस्त्यावर होर्डींग्ज असू नये, कोणते रंग असावेत कोणते असू नयेत, अश्लील मजकुर प्रसिध्द होऊ नये, फुटपाथ पासून चार फुट आतमध्ये होर्डींग्ज असावे, नागरीकांच्या तक्रारी असल्याने त्या ठिकाणी होर्डींग्ज उभारण्यात येऊच नये तसेच दोन होर्डींग्जमध्ये कीती अंतर असावे याची माहिती सुध्दा पालिकेने दिलेली आहे. अशी १८ नियमांची ही नियमावली आहे. आता याच नियमावलीची आठवण जाहीरातदारांना करुन देण्यात आली आहे. आता त्याचे पालन होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.