डोंबिवली: रविवारच्या मेगाब्लॉकनंतरही सोमवारी सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. पहाटेपासून जलद गाड्यांचे नियोजन सपशेल कोलमडल्यामुळे त्याचा परिणाम धीम्या मार्गावरील लोकल वाहतुकीवर झाला होता. पहाटे ५ नंतरची वाहतूक डोंबिवली स्थानकात फलाट १ ऐवजी फलाट २ वर तर कल्याण स्थानकातही २ ऐवजी फलाट १ वर अचानकपणे बदलण्यात आल्याने हजारो प्रवाशांची तारेवरची कसरत झाली. लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून आलेल्या प्रवाशांचे कल्याण स्थानकात आतोनात हाल झाले. अबालवृद्धांना घेऊन प्रवास करतांना त्यांचा गोंधळ उडाला होता.ऐरव्ही कल्याण रेल्वे स्थानकात फलाट ५ वर येणारी लेडीज स्पेशल सोमवारी अचानकपणे फलाट एक वर गेल्यानेही अनेक महिलांचा गोंधळ उडाला. डोंबिवली स्थानकात इंडिकेटर वर सकाळी ८.३0 वाजताची लोकल लावलेली असताना अचानकपणे महिला स्पेशल फलाटात आल्याने पुरुष प्रवाशांचा फियास्को झाला. अनेकांनी डब्यांच्या दरवाजात चढल्यानंतर आवाज देत महिला स्पेशल आहे, असा आरडाओरडा केला. त्यातच ऐरव्ही जेमतेम महिलांच्या प्रवाशांना लेडिज स्पेशलमध्ये जागा मिळवताना नाकी नऊ येतात, आजच्या गोंधळामुळे मात्र डोंबिवलीच्या महिलांनाही विंडो सिट मिळाल्याने आश्चर्य व्यक्त झाले. हा गोंधळ दुपारी चार नंतरही सुरू होता.संध्याकाळीही अप मार्गावरील मुंबई जलदची वाहतूक ही डोंबिवली स्थानकात फलाट ३ वर आली होती. त्यामुळे नेमका तांत्रिक घोळ काय झाला होता याबाबतची प्रवाशांना माहिती नसली तरी रेल्वे प्रशासन मात्र यामुळे हैराण झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारच्या मुंबई मुख्यालयातील अधिका-यांच्या बैठकीतही या गोंधळाचे पडसाद उमटले. वरिष्ठांनी परिचालन विभागातील अधिका-यांना गोंधळामागचे कारण आणि स्पष्टीकरण मागवल्याचेही सांगण्यात आले. संध्याकाळी उशिरापर्यंत विविध स्थानकांमध्ये फलाटांची अदलाबदल हा घोळ सुरूच असल्याचा त्रास प्रवाशांना झाला.
उपनगरीय लोकल वाहतूक विस्कळीतच, जलद, धीम्या लोकलच्या फलाटांची अचानक अदलाबदल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 5:40 PM