उल्हासनगर : शहरातील ओव्हरप्लो व तुंबलेल्या गटारी साफ करण्यासाठी महापालिकेकडून रोबोटचा वापर केला जातो. असे असतांना अनेक ठिकाणी भुयारी गटारी ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र असून कॅम्प नं-१ येथील तानाजीनगर येथील शाळा क्र- २३ व २६ जवळ भुयारी गटारी ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहल्याने, परिसरात दुर्गंधी पसरली होती. अखेर गटारीची सफाई केली.
उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-२३ व २६ समोर भुयारी गटारी ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहून परिसरात दुर्गंधी पसरल्याचे चित्र गुरवारी होते. याबाबत मनसेचे मैन्नूद्दीन शेख यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांना माहिती दिल्यावर, बुडगे यांनी गटारी साफसफाईसाठी सफाई कामगार पाठविले. महापालिका भुयारी गटारी साफ करण्यासाठी रोबोटचा वापर केला जातो. मात्र भुयारी गटार साफ करण्यासाठी रोबोट ऐवजी सफाई कामगार आल्याने, रॉबर्ट गेला कुठे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थितीत केला जात आहे.
महापालिका केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने भुयारी गटार योजना राबविण्यात येत असून योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुख्य मलनिस्सारण वाहिनी टाकण्यात आली. त्यानंतर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वडोलगाव, शांतीनगर व खडगोलवली येथे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात आले. तर तिसऱ्या टप्प्यात शहरातील भुयारी गटारीचे पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. दरम्यान महापालिका आयुक्त अजीज शेख व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या संकल्पनेतून भुयारी गटारी साफ करण्यासाठी रोबोटचा उपयोग केला जात आहे. असे असताना भुयारी गटारी तुंबल्याचे चित्र असून अनेक गटारी खचून धोकादायक झाल्या आहेत.