अंबरनाथ : घरची परिस्थिती हालाखीची, त्यातच वडिलांचे झालेले अकाली निधन अशा सर्व संकटांवर मात करत अंबरनाथच्या एका तरुणीने आपल्या जिद्दीवर मोठे यश मिळविले आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदासाठी तिची निवड झाली आहे. अंबरनाथमधील नवीन भेंडीपाडा परिसरात राहणारी स्नेहा चंद्रशेखर उबाळे या तरुणीने हे यश मिळविले आहे. घरात आर्थिक हातभार लागावा यासाठी नोकरी करत तिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत हे यश मिळविले. स्नेहाचे बालपण नवीन भेंडीपाडा परिसरातच गेले. अभ्यासात सर्वसामान्य असली तरी अभ्यासाची गोडी मात्र प्रचंड होती. स्नेहाने आपले शालेय शिक्षण हे अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षणही तिने विज्ञान शाखेतून याच महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर पदवीसाठी उल्हासनगरच्या सी.एच.एम. महाविद्यालयात पूर्ण केले. शिक्षणात खंड न पाडता तिने एमएससीची पदवी मुंबई विद्यापिठातून मिळविली. शिक्षण घेत असतांनाच नोकरीसाठी तिचे प्रयत्न सुरूच होते. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात असिस्टन्ट या पदावर ती कामाला लागली. काम करत असतांनाही तिला नोकरीत समाधान वाटत नव्हते. त्यामुळे स्नेहाने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. २०११ पासून ती परीक्षा देत होती. २०१३ मध्ये स्नेहाने पुण्यातील बार्टी संस्थेत प्रवेश घेतला. १२ ते १४ तास अभ्यास करत ती परीक्षा उत्तीर्ण झाली. तसेच मुलाखतीमध्येही तिने चांगली चमक दाखविली. (प्रतिनिधी)> दुसरा क्रमांक मिळविला : राज्यात आठवी येण्याचा मान तिने मिळाला. एवढेच नव्हे तर उपजिल्हाधिकारी पदासाठी ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तिची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली असून तिला दोन वर्षाचे स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाणार आहे. तिच्या या यशाने कुटुंबियांना आनंद झाला आहे.> स्पर्धा परीक्षेसाठी आत्तेभावाचे प्रोत्साहनस्नेहा लहान असतानाच वडिलांचे निधन झाल्याने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तिच्या आईवर आली. अशा संकटाने खचून न जाता तिच्या आईने मिलमध्ये काम करुन मुलांना मोठे केले. कठीण परिस्थितीत स्नेहाचे काका आणि काकू यांनीसुद्धा स्नेहाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले काका आणि काकू मला आई वडीलांप्रमाणेच असल्याचे स्नेहा आवर्जून सांगते. मात्र काकांचे निधन झाल्याने तिचा आधारच गेला. पण अशा परिस्थितीत स्रेहाला आई आणि काकू यांच्यासोबत स्नेहाचा आत्तेभाऊ अॅड. संदीप भराडे यांनी सहकार्य केले. संदीप यांनीच स्नेहाला स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले.
परिस्थितीवर मात करत जिद्दीने मिळविले उत्तुंग यश!
By admin | Published: April 11, 2016 1:25 AM