ठाणे : कोल्हापूर महापालिकेत झालेला महाविकास आघाडीचा पॅटर्न ठाणे महापालिकेतदेखील पाहायला मिळाला. अपेक्षेप्रमाणे महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के, तर उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. कोल्हापूरमध्ये शिवसेनेने महापौर निवडणुकीतून माघार घेतली होती, तर ठाण्यात शिवसेनेसाठी राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.ठाणे महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संपूर्ण महापालिका मुख्यालयात तसेच बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आली होती. पालिका मुख्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. पीठासीन अधिकारी म्हणून कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी काम पाहिले. या निवडणुकीत शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या विनंतीला मान देत, राष्टÑवादीने महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. त्यानुसार, महापौरपदासाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांनी, तर उपमहापौरपदासाठी पल्लवी कदम यांनी अर्ज दाखल केला होता. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी दौंड यांच्या उपस्थितीत म्हस्के आणि कदम यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या. राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या.या निवडणुकीत कोल्हापूर पॅटर्नचा प्रभाव दिसून आला. कोल्हापूरमध्ये राष्टÑवादीसाठी शिवसेनेने माघार घेतल्याने तिथे राष्टÑवादीचा महापौर झाला. त्याची परतफेड करत ठाण्यात शिवसेनेसाठी राष्टÑवादीने उमेदवार दिला नाही. एकूणच राज्यातील समीकरणे महापालिकांमध्येही रुजू होऊ लागल्याचे दिसत आहे.योग्यवेळी बोलू - उद्धव ठाकरेमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी महापालिकेत हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांनी महापौर कक्षात जाऊन नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य न करता काढता पाय घेतला. राज्याच्या सत्तास्थापनेबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता योग्यवेळी बोलू, असे ते म्हणाले.राष्टÑवादीने विनंतीला मान देत या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे त्यांच्यासह इतरांचेही मी आभार मानतो. २५ वर्षे ठाणेकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखविला आहे. या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. ठाण्याचा विकास हाच आमचा ध्यास असून विकासाला यापुढेही प्राधान्य दिले जाईल.- एकनाथ शिंदे, विधिमंडळ गटनेते, शिवसेनाआपल्या वाटा वेगळ्या असल्या, विचार वेगळे असले, तरी आपल्यातील मैत्रीचे नाते कायम आहे. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी, आपल्या निष्ठेबद्दल पक्षश्रेष्ठींच्या मनात शंका नाही. म्हस्के यांना महापौर करून एका शिवसैनिकाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्टÑवादीआज माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे. शहराच्या विकासावर भर देताना नगरसेवकांच्या अधिकारावर कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही, याची काळजी घेतली जाईल. - नरेश म्हस्के, महापौर, ठामपामाझ्यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जो विश्वास दाखविला, त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते. उपमहापौरपदासाठी कोणीही इच्छुक नव्हते. हे पद शापित असून या खुर्चीवर विराजमान झाल्यावर नगरसेवक म्हणून कारकीर्द संपत असल्याचा अंधविश्वास असल्यामुळे कोणीही हे पद घेण्यासाठी पुढे आले नाही. परंतु, हे पद शापित नसून त्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी मी १०० टक्के प्रयत्न करेन.- पल्लवी कदम, उपमहापौर, ठामपा
कोल्हापूर पॅटर्न ठाण्यात यशस्वी; महापौर, उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 1:03 AM