भिवंडी - भिवंडी शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्ट्रेम वॉटर डिस्ट्रीब्यूटर कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अत्यल्प होत असल्याने शेलार ग्रामपंचायतीवर पाणी संकट ओढवले आहे. याबाबत स्टेम प्राधिकरणाला शेलार ग्रामपंचायतच्या वतीने वारंवार लेखी निवेदने व तक्रारी अर्ज करूनही स्टेम प्राधिकरण शेलार ग्रामपंचायतच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे सतत दुर्लक्ष करीत होते.स्टेमचमुके या दुर्लक्षित कारभारामुळे शेलार ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट झाली आहे.स्टेम प्राधिकरणाच्या या नियोजनशून्य कारभाराविरोधात शेलार ग्रामपंचायतचे सरपंच एड. किरण चन्ने यांनी शेकडो ग्रामस्थांना सोबत घेऊन गुरुवारी भिवंडी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चाचे आयोजन केले होते.शेलार ग्राम पंचायत कार्यालयापासून निघालेल्या या हंडा मोर्चात शेलार गावातील शेकडो नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या.
या मोर्चा दरम्यान पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व स्टेम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तिकरित्या आंदोलकर्त्यांशी पाणी प्रश्नावर चर्चा केली.यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्टेम प्राधिकरणाचे अभियंता प्रथमेश पाटील यांना धारेवर धरत नागरिकांच्या पाणी प्रश्नात स्टेमने राजकारण करू नये असा इशारा आंदोलनकर्ते सरपंच किरण चन्ने यांनी या बैठकीत उपस्थित करत जोपर्यंत स्टेम प्राधिकरण पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका घेतली होती. अखेर आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य करत स्टेमने शेलार ग्राम पंचतीचा पाणी पुरवठा गुरुवारपासून सुरळीत करण्यात येईल व येत्या पंधरा दिवसात शेलार ग्राम पंचयातीस अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन स्टेम प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिले.त्यांनतर आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन स्थगित केले.
काटई व कांबा गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मिल्लत नगर येथून नवी पाईपलाईन प्रकल्प प्रस्थापित होता मात्र स्टेम प्राधिकरणाने मिल्लत नगर येथून पाईपलाईन न टाकता मागील तीन पाहिन्यांपासून शेलरच्या पाईपलाईनवर काटई कांबा गावची पाईपलाईन जोडली होती त्यामुळे मागील तीन चार महिने शेलार गावाला अत्यल्प पाणीपुरवठा होत होता त्यामुळे गावावर पाणी संकट आले असून अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये ज्यादा व सुरळीत पाणीपुरवठा केला नाही तर स्टेम विरोधात शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन केले जाईल अशी प्रतिक्रिया सरपंच किरण चन्ने यांनी दिली आहे.