पालघर : सफाळे व परिसरातील पाणथळ जमिनी, मिठागरातील भक्ष्य शोधण्यासाठी येत असलेल्या पक्ष्यांवर विषप्रयोग करून त्यांना भाजून त्यांच्या चविष्ट मांसावर ताव मारणाऱ्या टोळ्या सफाळे परिसरात सक्रिय झाल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वन विभागाने कडक कारवाईची मागणी केली जात आहे.सफाळे परिसरात मोठ्या प्रमाणात सागरी किनारा, खाडी, मिठागरे अशा पाणथळ जमिनीची उपलब्धता आहे. अशा ठिकाणी मिळणाऱ्या खाद्याच्या शोधार्थ फ्लेमिंगो, पानकावळे, चक्रवाक, ब्लॅक हेडेड आयबीस, पेंटेड स्टोर्क आदी स्वदेशी तसेच परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येत असतात. या पक्ष्यांची बंदुकीद्वारे शिकार करण्याप्रकरणी वनविभागाने स्थानिकांना बंदुकीसह पकडले होते. परंतु २ एप्रिल रोजी काही स्थानिक पर्यावरण आणि प्राणिप्रेमींना घार, बगळे आदी पक्षी मृतावस्थेत तर काही जखमी अवस्थेत सापडले होते. काही पक्ष्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मृत मासे किंवा मृत बेडकामध्ये कीटकनाशके, सहज उपलब्ध होणारे विष कालवून ते किनाऱ्यालगत ठेवल्यावर माश्यांवर ताव मारण्यासाठी येणारे पक्षी आपला जीव गमावून बसत असल्याच्या घटना घडल्या आहेत. या पक्ष्यांचे पोटातील अवयव काढून त्यात भुसा भरून ते पक्षी शोभिवंत वस्तू (टॅक्सीडर्मी) म्हणून विकणारी टोळी तर या भागात सक्रिय नाही ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. वनविभागाचे अपयशसफाळे परिसरात मृतावस्थेतील पक्ष्यांचे नमुने घेऊन ते शवविच्छेदनासाठी वनविभागाने पाठविले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पक्ष्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. दरम्यान, पक्ष्यांना मारण्याच्या घटनांत वाढ होत असून, सफाळे वनविभागाचे अधिकारी मात्र या पक्ष्यांच्या मारेकऱ्यांना रोखण्यात अपयशी ठरत आहेत.
टॅक्सीडर्मीसाठी सफाळेत पक्ष्यांवर विषप्रयोग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 12:43 AM