मीरा रोड, दि. 8 - आजच्या दगदगीच्या जीवनात आपण एवढे व्यस्त होऊन जातो की जेवणाची वेळ सुद्धा पाळत नाही. परंतु मीरा रोड येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय शोएबला गेली ६ महिने घासभर अन्नही गिळता येत नव्हते, जेवणानंतर पोटातील अन्न जसेच्या तसे परत बाहेर होते. त्यामुळे तो फक्त पाण्यावर दिवस काढत होता. अन्ननलिकेला 'अचलसिया कार्डिया' हा दुर्मिळ आजार शोएबला असल्याचे निदान झाले. त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात मीरा रोडच्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरना यश आले आहे . शोएबने या आजारावर अनेक डॉक्टरांकडून उपचार केले. सुरुवातीला अपचन अथवा गॅसेसचा त्रास असेल म्हणून थोडे दुर्लक्षही केले. परंतु काही दिवसातच त्याचे वजन कमालीचे कमी होऊन त्याची तब्येत अजूनच खालावली. पंधरा दिवसांपूर्वी शोएबच्या मित्राने मीरा रोड खाजगी हॉस्पिटलमधील पोटातील आतड्यांचे शल्यविशारद डॉ. इमरान शेख यांना भेटण्यास सांगितले, असता डॉ. इमरान शेख यांनी सर्व तपासण्या केल्यावर त्याच्या अन्ननलिकेला 'अचलसिया कार्डिया' हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान केले. याविषयी अधिक माहिती देताना एचपीबी डॉ. इमरान शेख म्हणाले, "आपण जे अन्न खातो, ते अन्ननलिकेच्या मार्फत जठरामध्ये जाते. अन्ननलिका व जठराच्या मध्ये एक गोलाकार रींग असते. ही रींग खाल्लेले अन्न हळू हळू आपल्या जठरात सोडत असते. या दुर्मिळ आजारात ही रिंग आकुंचन पावून अन्ननलिका व जठराचा दुवा बंद करते. या रींगमुळे दुहेरी फायदा असा असतो की आपण खाल्लेले अन्न हळू हळू जठरात जाते व जठरातून ते परत अन्ननलिकेत येत नाही. शोएबच्या केसमध्ये ही रींग पूर्णपणे आकुंचन पावून बंद झाली होती त्यामुळे आम्हाला कार्डीओमायोटोमी व फंडोप्लिकेशन करावे लागले. यामध्ये लॅप्रोस्कॉपीच्या मदतीने आम्ही या रिंगचा आकार मोठा केला व त्याचबरोबर जठराचा आकारही थोडा कमी केला जेणेकरून खाल्लेले अन्न सुलभरीत्या जठरात जाऊ शकेल व ते जठरातून परत येणार नाही. या शस्त्रक्रियेची जमेची बाजू म्हणजे पेशंट दोन तासातच पूर्वीसारखा खाऊ पिऊ शकतो. शोएबचे वजनही गेल्या दहा दिवसात चांगल्या प्रकारे वाढले आहे.काहीजणांना हा आजार जन्मजात असतो तर काहींना लहानपणापासून त्रास होत असतो. वयाच्या तिशीमध्ये हा आजार जास्त बळावतो. या आजाराविषयी अजूनही आपल्या समाजात जागरूकता आलेली नाही. अन्न बारीक करून खाणे व ते व्यवस्थितरीत्या पचवण्याचे काम आपल्या शरीरातील अनेक छोटे मोठे अवयव करीत असतात. या प्रकियेत काही खंड पडत असेल तर तात्काळ योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे मत वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी यांनी व्यक्त केले.
सहा महिन्यापासून उपाशी असलेल्या युवकाच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 4:15 PM