ठाणे : शिवसेनेच्या शहापूर उपतालुकाप्रमुखाच्या हत्येचा उलगडा ठाणे पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत केला. सेनेच्या या पदाधिकाऱ्याचे अनैतिक संबंध होते. या वादातूनच त्याच्या पत्नीने हत्येची सुपारी दिली होती. पोलिसांनी तिच्यासह मारेकºयालाही मंगळवारी बेड्या ठोकल्या.शहापूर तालुक्यातील अघई येथील रहिवासी शैलेश निमसे यांचा मृतदेह २० एप्रिल रोजी भिवंडी तालुक्यातील देवचोळे येथील टेकडीवर अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळाला होता. गणेशपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती, सीसी कॅमेºयाचे फुटेज आणि अन्य तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून पोलिसांनी आसनगाव येथील प्रमोद वामन लुटे याला मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली.पोलिसांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शैलेश निमसे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यावरून त्यांचा पत्नी साक्षीसोबत नेहमी वाद व्हायचा. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर त्याने साक्षीच्या बळजबरीने सह्यादेखील घेतल्या होत्या. त्यामुळे पतीच्या संपत्तीतून आपण बेदखल होऊ, अशी भीती साक्षीला वाटत होती. यातूनच तिने पतीच्या हत्येची सुपारी तिचा परिचित प्रमोद लुटे याला दिली. घटनेच्या दिवशी तिने ठरल्याप्रमाणे घराचा दरवाजा आतून बंद केला नव्हता. रात्रीच्या वेळी प्रमोद लुटे याने साथीदारांच्या मदतीने शैलेश निमसेची पट्ट्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर, साथीदारांच्या मदतीने एका कारमध्ये शैलेश निमसे याचा मृतदेह देवचोळी टेकडीवर नेऊन जाळला. संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी प्रमोद लुटे आणि साक्षी निमसे यांना मंगळवारी अटक केली. प्रत्यक्ष हत्येमध्ये आणखी दोन आरोपी आणि पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी, अशा आणखी तिघांचा शोध पोलीस यंत्रणेकडून सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.साक्षीवरील अत्याचाराची परिसीमाशैलेश निमसे हा पत्नी साक्षीला नेहमी मारहाण करायचा. तो अतिशय विकृत मानसिकतेचा होता. एरव्ही, कोणताही पुरुष आपले अनैतिक संबंध पत्नीपासून लपवतो. शैलेश मात्र त्याचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते, तिला रात्री पत्नीच्या डोळ्यांदेखत व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे करायचा. एवढेच काय, तिच्यासोबतचे फोटो तो पत्नीच्या मोबाइल फोनवर पाठवायचा. पतीचे हे चाळे साक्षीला पाहावले जात नव्हते. यावरून तिचे आणि पतीशी अनैतिक संबंध ठेवणाºया महिलेचे काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते. त्यावेळी त्या महिलेने साक्षीला घरात घुसून मारहाण केली होती. शैलेश निमसे याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्याच्या एका मुलीला वडिलांच्या अनैतिक संबंधांची माहिती समजली होती. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पतीला चांगल्या मार्गावर लावण्यासाठी साक्षीने उपवास केले; एवढेच काय तंत्रमंत्रही केले. मात्र, पतीमध्ये सुधारणा झाली नाही. अखेर, पतीच्या अत्याचारांनी परिसीमा गाठली आणि साक्षीने त्याला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.मुख्यमंत्र्यांकडून विशेष सूचनाअहमदनगरपाठोपाठ शहापूरच्या शिवसेना पदाधिकाºयाची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास काळजीपूर्वक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, पोलीस अधीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण आणि गणेशपुरी पोलीस ठाण्याची विशेष पथके तयार करण्यात आली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी चार दिवस जातीने या प्रकरणाच्या प्रत्येक मुद्याकडे बारकाईने लक्ष दिले. गेल्या चार दिवसांमध्ये पोलिसांनी जवळपास २०० संशयितांची चौकशी केली. त्यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश होता. शैलेश निमसे हा शहापूर तालुक्यातील अघई गावचा रहिवासी होता. या गावाजवळील एका विद्यालयाजवळ घटनेच्या दिवशी सकाळी ६ वाजताचे सीसी कॅमेºयाचे फुटेज पोलिसांना मिळाले होते. निमसेचा मृतदेह ज्या कारमध्ये नेला होता, ती कार या फुटेजमध्ये दिसली. आरोपींना पकडण्यासाठी हा पुरावा महत्त्वाचा ठरला.दीड लाखात दिली होती सुपारीसाक्षीने पतीच्या हत्येची सुपारी दीड लाख रुपयांमध्ये दिली होती. त्यापैकी सव्वा लाख रुपये आरोपीला दिले होते. पोलिसांनी शैलेश निमसेचा मृतदेह नेण्यासाठी वापरलेली कार आणि गळा आवळण्यासाठी वापरलेला पट्टा हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक महेश पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, गणेशपुरीचे पोलीस निरीक्षक शेखर डोंबे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल वायकर यांनी या प्रकरणाचा तपास केला.
पत्नीनेच दिली उपतालुकाप्रमुखाच्या हत्येची सुपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 3:20 AM