मीरारोड - भाईंदर पूर्वेस रेल्वे स्थानक समोर असलेल्या नवकीर्ती प्रिमायसेस इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू व चौघे जखमी होऊन रिक्षा आणि दुचाकीचे नुकसान झाले आहे. नवघर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला असून दुसरीकडे पोलीस हे महापालिका या प्रकरणी फिर्याद देईल याच्या प्रतीक्षेत असून फिर्याद येताच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ग्रामपंचायत काळातील १९८० च्या दशकातील नवकीर्ती इमारतीच्या तळ मजल्यावर १७ गाळे असून इमारतीत एकूण १०१ गाळे आहेत. तळ आणि पहिल्या मजल्यावर बार होते. तळमजल्यावर अन्य हॉटेल व दुकाने, स्टील उद्योग, पहिल्या मजल्यावर बार शिवाय प्रिंटींग प्रेस आदी चालत होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यांवर बारचे कर्मचारी रहात होते. अनेक गाळे हे रिकामी केले गेले होते.
गुरुवार २० जुलै रोजी पहिल्या मजल्यावरील रुपेश ऑर्केस्ट्रा बारचा भाग कोसळून एकाचा मृत्यू तर ४ जण जखमी झाले होते. इमारतीचा भाग सकाळी कोसळला असताना दुपारी अडीज - तीनच्या सुमारास ढिगाऱ्याखाली दुर्गा अवधेश राम (४८) रा. नालासोपारा यांचा मृतदेह आढळून आला होता. म्हणजेच सकाळी तात्काळ सर्व ढिगारा बाजूला केला असता तर कदाचित दुर्गा यांचा जीव वाचला असता अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या इमारतीत बारवाल्यांचेच वर्चस्व असल्याने हि बारवाली बिल्डिंग ठरली होती . सुमारे ४३ ते ४५ वर्ष जुन्या असलेल्या ह्या इमारतीला पालिका पॅनल वरील स्ट्रक्चरल ऑडिटर योगेश पटेल यांच्या २३ जूनच्या अहवाला नंतर ५ जुलै रोजी पालिकेच्या प्रभाग अधिकारी जितेंद्र कांबळे यांनी धोकादायक घोषित करत नोटीस बजावली. १२ जुलै पासून इमारत तोडण्याच नोटीस मध्ये आदेशित केले असताना देखील २० जुलै पर्यंत बार, दुकाने आदी सुरु होते. इमारतीचा वीज पुरवठा, पाणी पुरवठा खंडित केला गेला नव्हता.
१९८० सालच्या दरम्यानची हि जुनी इमारत असून १९९३ साली ती धोकादायक ठरल्याने तत्कालीन नगरपरिषद काळात ती रिकामी करून सील करण्यात आली होती. मात्र त्या नंतर दुरुस्ती परवानगी देण्यात आली होती. इतकी जुनी व मुख्य वर्दळीच्या ठिकाणी इमारत असून इतकी वर्ष स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये ती धोकादायक असल्याचे निदर्शनास कशी आली नाही? यंदा निदर्शनास येऊन देखील कार्यवाहीला विलंब का झाला? प्रभाग समिती कार्यालया कडे पूर्वीची प्रशासकीय माहिती नव्हती का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
पालिकेने ५ जुलैची नोटीस देऊन त्यात १२ जुलै पासून इमारत तोडण्याचे सांगून सुद्धा कार्यवाही केली नाही म्हणून इमारतीतील गाळा धारक व आरपीआय कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष सतीश जैस्वाल यांनी महापालिका व पोलिसांना लेखी पत्र देऊन दुर्घटना होण्याची व जीवित हानीची भीती वर्तवली होती.
येथील ज्येष्ठ माजी नगरसेवक रोहिदास पाटील यांनी सांगितले की, रहदारी व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या तसेच लोक रहात असलेल्या इमारती धोकादायक असतील तर त्यावर तात्काळ कार्यवाही केली गेली पाहिजे. जेणेकरून दुर्घटना टळून लोकांचे किंवा जाणार नाहीत. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांनी सांगितले की, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून महापालिकेच्या वतीने फिर्याद आल्यावर आवश्यक कायदेशीर कार्यवाही केली जाईल. महापालिकेकडे इमारती बाबतची माहिती मागवण्यात आली आहे.