कल्याण : मुरबाड-आळेफाटा मार्गावर ढाब्यावर जेवण करून निघालेल्या एका कुटुंबाच्या मोटारीला अन्य तरुणांच्या गाडीने धडक दिली. त्यात मोटारीचे नुकसान झाल्याने भरपाई मागितल्याच्या रागातून तरुणांनी महिलेला जबर मारहाण केली. त्यात तिच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाल्याने एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, तिला माफी मागायलाही भाग पाडले. तसेच ती माफी मागताना व्हिडीओ बनवला. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मारहाण करणाऱ्यांच्या गाडीचा नंबर मिळाला आहे. त्याआधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मुंब्रा येथील रफिक शेख व त्यांचे नातेवाइक मोटारीने अहमदनगरहून मुंब्रा येथे येत होते. वाटेत ते कालिचरण ढाब्यावर जेवणासाठी थांबले. जेवण आटोपून पुन्हा गाडी काढत असताना रफिक यांच्या गाडीला पार्किंग करणाऱ्या एका गाडीने धडक दिली. त्यामुळे रफिक यांनी भरपाई मागितली. रफिक यांच्यासह पत्नी व अन्य महिलाही होत्या. त्या वेळी धडक मारणाऱ्याने पुढे निघ, तुला भरपाई देतो, असे सांगितले. रफिक यांची गाडी वरप गावाजवळ येताच गाडी थांबवली. तेव्हा रफिक यांना वाटले की, समोरचा गाडीचालक भरपाई देणार आहे. धडक देणाऱ्या गाडीतून काही मंडळी उतरली. त्यांनी रफिक व त्यांच्या मोटारीतील महिलांना मारहाण केली. रफिक यांची पत्नी नाहिद हिलाही जबर मारहाण केली. या वेळी नाहिदला मारहाण करणाऱ्यांनी माफी माग, असे सांगितले. तिने माफी मागताच मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने तिचा व्हिडीओ काढला. टिटवाळा पोलिसांकडे वर्ग रफिक यांच्या मारहाण करणाऱ्यांच्या गाडीचा नंबर आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्यामुळे पुढील तपास टिटवाळा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. पोलीस गाडीच्या नंबरद्वारे मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
भरपाई मागितल्याने महिलेस जबर मारहाण
By admin | Published: September 27, 2016 3:35 AM