बदलापूर : पारखे परिवार न्यास पुणे, मातोश्री माईसाहेब पारखे मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा मानाचा आदर्श माता पुरस्कार अपंगांची माता सुजाता सुगवेकर यांना एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. अनाथाची माता होणे सोपे, पण शारीरिक आणि मानसिकदृष्टया विकलांग मुलांचे संगोपन आणि स्वावलंबित्व यावर काम करणे महाकठीण आहे. सुगवेकर यांनी हे महान कार्य केले आहे. ७० मुलांची जबाबदारी यशस्वीपणे उचलली आहे. संगोपिताच्या माध्यमातून हे कार्य सुगवेकर यांनी सुरू ठेवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊ न पारखे न्यासाचे विश्वस्त डॉ. प्रकाश पारखे आणि सरोज पारखे व परिवार यांनी सुगवेकर याना यंदाचा आदर्श माता पुरस्कार प्रदान केला. रोख २५ हजार रुपये आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. विजय धारवाडकर, डॉ. विनया धारवाडकर, डॉ. शकुंतला चुरी, रवींद्र सुगवेकर, भाजपचे शहर अध्यक्ष संभाजी शिंदे, तात्यासाहेब सोनवणे, संगोपिताचे हबीब बंधू, उमेश पाटकर, अजित लिपणकर, कमलाकर चाळके आदी उपस्थित होते.