ठाणे : भाजपाने निवडणुकीच्या आधीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही बडे मासे गळाला लावून या तिन्ही पक्षांना धक्का दिला होता. परंतु, आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, सुहासिनी लोखंडे या नगरसेविकेला शिवसेनेने आपल्या कळपात आणून भाजपाला नौपाड्यात मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे या भागात त्याचे परिणाम भाजपाच्या उमेदवारांना भोगावे लागण्याची चिन्हे आहेत.निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपाने इतर पक्षांतील सुमारे २० हून अधिक आजीमाजी नगरसेवक गळाला लावले. यामध्ये सेनेचेदेखील बडे मासे आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यामुळे हे धक्के सेनेला पचवण्यासारखे नव्हते. सेनेनेदेखील निवडणुकीपूर्वी काही धक्के दिले. परंतु, आता निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेने एक धक्का दिल्याचे बोलले जात आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत नौपाडा भागातून सुहासिनी लोखंडे या भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मात्र, महापौर निवडणुकीच्या वेळी त्या अचानक बेपत्ता झाल्या आणि एका रात्रीत संपूर्ण राज्याला परिचित झाल्या. परंतु, यामुळे भाजपावर नामुश्की ओढवली होती. यंदाच्या निवडणुकीत पक्षाने लोखंडे यांची उमेदवारी कापली. उमेदवारी कापल्याने त्या नाराज होत्या आणि त्यांचे पती सुनील लोखंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणुकीतून माघार घेतली. असे असतानाच रविवारी सुहासिनी यांनी पती सुनील लोखंडे यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी राजेश शिंदे, राजू घरत, संजय पवार, विजय साळुंखे यांच्यासह ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे किसननगर भागातील माजी नगरसेवक बाळा घाग यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. घाग यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने राष्ट्रवादीने सेनेला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. (प्रतिनिधी)
सुहासिनी लोखंडे यांचा शिवसेनेत प्रवेश
By admin | Published: February 14, 2017 2:57 AM