हितेन नाईक/ पालघर :-पालघर जिल्हाच्या डहाणू तालुक्यातील रानशेत येथील आश्रम शाळेत इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न सहकारी विद्यार्थिनीच्या सतर्कते मुळे अयशस्वी झाला.
पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज(रविवारी) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास डहाणूच्या रानशेत आश्रम शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ती स्वच्छतागृहात जाऊन ओढणी च्या साहाय्याने गळफास घेण्याच्या तयारीत होती. स्वच्छ्ता गृहात गेल्यावर बराच वेळ झाला तरी ती बाहेर येत नसल्याने सहकारी विद्यार्थिनीला संशय आला.तिने स्वाचतगृहाच्या बाहेर जाऊन दरवाजा ठोठावून तिला हाका मारल्यानंतर आतून कुठलाही प्रतिसाद आला नाही. दरवाजा तोडून आत शिरल्यावर
ती गळफास घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या सहकारी विद्यार्थ्यांनी हा प्रसंग पाहून तत्काळ शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाला याची माहिती दिली. आश्रम शाळेतील सफाई कामगाराने तत्काळ धाव घेतली. विद्यार्थींनीला खाली उतरवले मात्र ती बेशुद्ध अवस्थेत होती. विद्यार्थिनीला तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले . जिथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला सिलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे आश्रम शाळेत विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. या प्रकरणात रॅगिंगचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र त्याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
देशात आणि राज्यात सध्या महिला आणि विद्यार्थिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असून त्यातलाच हा काहीसा प्रकार आहे . त्यामुळे या सगळ्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी . जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.-अमित घोडा, माजी आमदार
या विद्यार्थिनीला आपण स्वच्छतागृहात जाताना पाहिलं होतं . त्यामुळे ती बराच वेळ बाहेरून आल्याने मला संशय आला . वारंवार आवाज देऊन देखील तिने प्रतिसाद न दिल्याने मी शाळेतील शिक्षकांना त्याची माहिती दिली.-प्रत्यक्षदर्शी विद्यार्थिनी