ठाणे : नौपाड्यातील एका बारमध्ये गाणाºया पश्चिम बंगालच्या तरुणीने रविवारी रात्री घोडबंदर रोडवरील एका सोसायटीच्या इमारतीवरून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.पश्चिम बंगालची सुनीता दास (वय २८) नौपाड्यातील एका बारमध्ये गाणे गाण्याचे काम करायची. घोडबंदर रोडवरील कॉसमॉस ज्वेलर्समध्ये बाराव्या मजल्यावर ती भाड्याने राहायची. रविवारी रात्री उशिरा तिने इमारतीवरून उडी मारली. सोमवारी सकाळी कासारवडवली पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घराची पाहणी केली. तेव्हा तेथे आढळलेल्या सामानावरून तिने रात्री मद्यपान केले असावे, अशी प्राथमिक माहिती समोर आली. याशिवाय, तिच्या फ्लॅटमध्ये अर्धवट जळालेल्या सिगारेट मोठ्या प्रमाणात होत्या. ही तरुणी अविवाहित होती. ती नशेच्या आहारी गेली असावी, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली. आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येपूर्वी ती कोणाशी बोलली होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत. कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
बार गायिकेची इमारतीवरून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 6:52 AM