डोंबिवली: खुशी गोविंद मौर्या (वय १६) या दहावीतील विद्यार्थीनीने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० ते १ दरम्यान घडली. पुर्वेकडील राजाजी पथ परिसरातील सदगुरू सेवासदन सोसायटीत कुटुंबासह राहणा-या खुशी ने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
खुशी ची सहामाही परिक्षा सुरू होती. सोमवारी ती दुपारी १२ वाजता परिक्षा देऊन घरी आली. आई फुलकुमारी ही लहान भाऊ शिवा याला शाळेत सोडण्यास जात असताना खुशी ने तीला पेरू घेवुन यायला सांगितले. दरम्यान तीची आई मुलाला सोडून घरी परतली असता खुशीने दरवाजा उघडला नाही. खुशी प्रतिसाद देत नसल्याने तीच्या वडीलांना बोलावून घेण्यात आले. त्यांनी शेजा-यांच्या मदतीने इमारतीच्या गच्चीवरून रस्सीच्या सहाय्याने घराच्या किचनच्या खिडकीतून आत शिरकाव केला. तेथून घराच्या हॉलमध्ये जाऊन पाहिले असता खुशी सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आली.
तीला खाली उतरवून केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले गेले. मात्र तेथील डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषीत केले. दरम्यान या घडलेल्या घटनेने मौर्या कुटुंबाला धक्का बसला आहे. खुशीने कोणत्यातरी नैराश्येतून आत्महत्या केली. तीच्या मरणाबाबत आमची कोणाविरूध्द तक्रार नाही असे तीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहीतीत म्हंटले आहे. त्यामुळे खुशीच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? याचे गुढ कायम राहीले आहे.
खुशी ही अभ्यासात हुशार होती. ती चित्र अप्रतिम काढायची. चित्रकला स्पर्धांमध्ये तीने अनेक पारितोषिके पटकावली होती. १४ तारखेला शुक्रवारी तीचा वाढदिवस होता. तेव्हा तीने मैत्रीणींबरोबर वाढदिवसाचे सेलिब्रेशन देखील केले होते. पण तीने आत्महत्येचे पाऊल का उचलले ते समजत नाही अशी माहीती स्थानिक माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी दिली.