उल्हासनगर : पठाणी व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून रविना गायी यांनी गुरवारी सायंकाळी आंबिवली स्टेशन परिसरात लोकल ट्रेन खाली आत्महत्या केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी संगीता जोकांनी या महिलेवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पठाणी व्याजखोरांचा पर्दापाश झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात राहणाऱ्या रविना गायी यांचा मृतदेह कल्याण ते आंबिवली स्टेशन दरम्यान गुरवारी सायंकाळी मिळाला. रविना हिने पठाणी व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांकडून झाला. गायी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी १२ सप्टेंबर रोजी एक निवेदन उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिले होते. पोलिसांनी वेळीच निवेदनाची दखल घेतली असतीतर, रविना गायी यांचा जीव वाचला असता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. रविना गायी यांची ६ महिन्यांपूर्वी संगीता गोविंद जोकांनी या महिले सोबत ओळख झाली होती. जोकानी ही महिला व्याजाने पैसे देते, असे समजल्यावर रविना हिने तिच्याकडून व्याजाने पैसे घेऊन मुदत व व्याजासह परत केले.
दरम्यान जोकांनी यांनी ग्राहक आणून दिल्यास, त्यांनाही व्याजाने पैसे देतो. अशी म्हणाली. त्या दरम्यान श्वेता लोईया, प्रगती सपकाळे, मनोज पंजवानी व गणेश माखिजा यांची ओळख संगीता जोकांनी यांच्या सोबत रविना हिने करून दिली. जोकांनी यांनी या चौघांना प्रत्येकी १ लाख रुपये व्याजाने दिले. मात्र हे चौघे व्याजाचे व मुदलचे पैसे देत नसल्याने, जोकांनी यांनी ओळख करून देणाऱ्या रविना गायी याना जबाबदार धरून, पैसे देण्याचा तगादा लावला. तू मेली तरी तुझ्या पती व मुलांकडून वसूल करेल, अशी धमकी दिल्याने, रविना घाबरून गेली. रविना मुलगा डिप्रेशन व पती आजारी आहेत. तर सासरे नायर मुंबई येथे उपचार घेत आहेत. असे उल्हासनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात गायी यांनी म्हटले.सहायक पोलिस आयुक्त अजय कोळी यांनी पठाणी व्याजातून महिलेची आत्महत्या झाल्याची घडल्याची माहिती दिली आहे.
संगीता जोखानी महिलेवर गुन्हा व्याजाचा धंदा करणारी संगीता जोखाणी या महिलेवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात रविना गायी आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे यांनी माहिती दिली असून याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.