ठाणे : आपल्याच घराला आधी आग लावल्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन अजिंक्य रमेश निकाळजे (२१) या उच्चशिक्षित पण मनोरुग्ण तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.कळव्याच्या पारसिकनगर ‘मोरेश्वर को-आॅपरेटिव्ह सोसायटी’ या इमारतीच्या दुसºया मजल्यावर निकाळजे कुटुंब राहते. बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास त्यांच्या घरातून धूर आणि वास येत असल्याचे इमारतीमधील रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला.गेल्या दोन वर्षांपासूनच ठाण्यातील एका बड्या मनोविकारतज्ज्ञांकडे अजिंक्यवर उपचार सुरू होते. पुण्यात त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. त्यात तो अनुत्तीर्ण झाला होता. यासह आणखी काही कारणांनी तो वैफल्यग्रस्त होता. त्याचे आईवडील दोन दिवसांपासून बाहेर गेले होते. बुधवारी सकाळी ७.३० ते ८ वा.च्या सुमारास त्याने घरात आग लावली. त्यानंतर, स्वयंपाकघरातील पंख्याला स्वत:ला गळफास लावून घेतला. आगीचा भडका वाढल्यानंतर नायलॉनची दोरी तुटल्यामुळे त्याचा मृतदेहही खाली पडल्याचे आढळले. दरम्यान, ही आग विझवण्यासाठी ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांच्या घराचा दरवाजा तोडावा लागला. आत आगीचे मोठे लोळ होते. बेडरूम तर जळून पूर्ण खाक झाली. स्वयंपाकगृहातील पंख्याला त्याने गळफास घेतलेला होता. नायलॉनची दोरी वितळल्याने तो खाली कोसळल्याचे चित्र पोलीस आणि अग्निशमन दलाला पाहायला मिळाले. घरातील आग अवघ्या अर्ध्या-पाऊण तासात नियंत्रणात आणून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी तो जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात गळाफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.तुला सोडणार नाही...काहीसा मानसिक रुग्ण असलेल्या अजिंक्यची घरात नेहमीच चीडचीड असायची. त्यातूनच त्याचा मावस बहिणीवरही राग होता. याच रागातून त्याने भिंतीवर तिचे नाव टाकून ‘तुला सोडणार नाही’ असे लिहिल्याचे पोलिसांना आढळले.आईवडिलांनी केली होती तक्रारअजिंक्यचे घरातल्या व्यक्तींवर आरडाओरडा करणे अलीकडे जास्तच वाढले होते. आईवडिलांनाही शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याची त्याची मजल गेली होती. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याची तक्रार केली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बुगडे यांनी दिली.
घराला आग लावून केली आत्महत्या, जीव देणारी व्यक्ती मनोरुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:01 AM