ठाणे : स्वरानंद प्रस्तुत तसेच लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ उपक्रमांतर्गत सुमनसुगंध हा कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी काशिनाथ घाणेकर येथे संपन्न झाला. या वेळी निवेदिका मंगला खाडिलकर यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना बोलते करून त्यांच्या सांगीतिक जीवनाचा प्रवास उलगडला.अखियाँ मिला के, जवा है मोहब्बत हसी है जमाना, यासारख्या गाण्यांचा प्रभाव असणाऱ्या सुमनतार्इंनी वयाच्या १३-१४ व्या वर्षी कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. केशव भोळे यांच्याकडून संगीताचे ज्ञान घेतलेल्या सुमनतार्इंनी ८० दशकातील काळ गाजवला.स्वराबरोबर भाव आणि शब्दांचाही संगम होत असतो, असे त्यांनी सांगितले. त्यांनी जिथे सागरा धरणी मिळते, ना तुम हमे जानो ना हम तुमे जाने, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे है जबानपर आदी गाण्यांची झलक रसिक प्रेक्षकांना ऐकवली. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या नाम संस्थेला कार्यक्रमामधून संकलित झालेला निधी संस्थेचे सदस्य सचिन पाटेकर यांच्याकडे देण्यात आला. या वेळी लोकमतचे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या हस्ते सुमन कल्याणपूर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाला स्वरानंद संस्थेचे हर्षदा शिंदे, स्वरा शिंदे, संदीप शिंदे तसेच अनुदान प्रॉपर्टीजच्या सुनीता शिंदे, नतेश शिंदे, सुब्रह्मण्यम शिंदे आणि अथर्व एंटरटेन्मेंटचे प्रसाद कारूळकर यांचा हातभार लागला. माधुरी करमरकर, मंदार आपटे, विद्या करंदीकर यांनी सुमनतार्इंनी गायलेली बहारदार गाणी सादर केली. शिक्षण क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या वकील शरद चिटणीस, परशुराम राऊत या ठाणेकरांचा सुमन कल्याणपूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
ठाण्यात उलगडला सुमन कल्याणपूर यांचा जीवनपट
By admin | Published: October 13, 2015 1:50 AM