डोंबिवली : प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन रिक्षाचालकाला लुटण्याचा प्रकार सोमवारी दुपारी दोन वाजता घडला. रिक्षाचालक संजय भागवत यांना पश्चिमेकडील महात्मा फुले रिक्षातळ या ठिकाणी शहाड येथील बिर्ला मंदिराचे भाडे मिळाले. दोन प्रवाशांना घेऊन ते बिर्ला मंदिराच्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी दर्शन घेऊन आलेल्या संबंधित प्रवाशांनी त्यांना प्रसादाचा पेढा खायला दिला. या पेढ्यात गुंगीचे औषध टाकले होते. पुढे कल्याण प्रेम ऑटो परिसरात आले असता त्यांना प्रवाशांनी आईस्क्रीमही खायला दिले. भागवत हे गुंगीच्या औषधाने बेशुध्द पडल्यावर दोघा प्रवाशांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चेन आणि पाकिटातील दोन हजार लंपास केले. भागवत हे शुध्दीवर येताच त्यांना आपण लुबाडलो गेल्याचे लक्षात आले. विष्णूनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
------------------------------------------------------
स्वच्छतागृह दुरवस्थेच्या गर्तेत
कल्याण : येथील पूर्वेकडील नेतीवली परिसरातील केडीएमसीच्या स्वच्छतागृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य या ठिकाणी असते. स्वच्छतागृहाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने देखभाल दुरुस्तीअभावी तेथील भिंतींवर रानटी झाडे उगवली आहेत. त्यामुळे बांधकामालाही भविष्यात धोका पोहोचू शकतो. तातडीने स्वच्छतागृहाची दुरुस्ती करावी अन्यथा एखादा अपघात घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची राहील याकडे येथील सामाजिक कार्यकर्तेे यांनी लक्ष वेधले आहे.
------------------------------------------------------
फोटो आहे