ठाणे : महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना, आता उन्हाळ्यात ठाणेकरांचे पोहणेही महाग होणार आहे. कारण ठाणे महापालिकेने यापूर्वी सलग तीन वर्षे तरणतलावांच्या शुल्कात वाढ केलेली असताना यंदाही ते १० टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव १९ मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
महापालिकेच्या मालकीचे सध्या तीन तलाव असून, यामध्ये गडकरी रंगायतन, तीनहातनाका आणि तिसरा मनीषानगर येथील तलावाचा समावेश आहे. तीनहातनाका येथील तरणतलाव सध्या खासगी संस्थेला चालविण्यासाठी दिला असून, तो सध्या बंद आहे. या तलावाचेही खासगीकरण करण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला होता. मनीषानगर येथील तलावामध्ये सराव करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्वीमर तयार झाले आहेत. ठाणेकरांना फार कमी प्रमाणात तरणतलाव उपलब्ध असताना, आता गडकरीजवळील मारोतराव शिंदे तलाव आणि मनीषानगर येथील यशवंत रामा साळवी तलाव या तलावांचे दर पुढील तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.
कळवा प्रभाग समितीच्या हद्दीमधील ठाणे महापालिकेच्या कळवा हॉस्पिटलनंतर आता कै. यशवंत रामा साळवी तरण तलाव सध्या चर्चेचा विषय झाला आहे. जुन्या प्रभाग समितीच्या परिसरात असलेला हा तलाव फार जुना असून, या ठिकाणी येणाऱ्या सभासदांची संख्यादेखील हजारोंच्या घरात आहे. परंतु, आता महापालिकेने तरण तलावांच्या शुल्कात वाढ करण्याचे प्रस्तावित केले असल्याने येथे येणाऱ्यांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. त्यानुसार पहिल्यावर्षा १० टक्के, दुसऱ्यावर्षी १५ आणि तिसऱ्यावर्षी २० टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे.
कै. मारोतराव शिंदे तरणतलाव
वार्षिक सभासद शुल्क (५ ते १५ वर्षे) सध्या दोन हजार ६७० असून, त्यात १० टक्के वाढ झाल्यानंतर ते दोन हजार ९४० रुपये भरावे लागणार आहेत, तर १५ वर्षांपुढील सभासंदासाठी पाच हजार ३५० ऐवजी पाच हजार ८८५ रुपये भरावे लागणार आहेत. तर प्रवेशशुल्कासाठीही ८५० ऐवजी ९३५ रुपये मोजावे लागणार आहेत.
यशवंत रामा साळवी तरणतलाव
वार्षिक सभासद शुल्क (५ ते १५ वर्षे) सध्या तीन हजार ३८० यात १० टक्के वाढ झाल्यानंतर ते तीन हजार ७२० रुपये भरावे लागणार आहेत; तर १५ वर्षांपुढील सभासंदासाठी सहा हजार ६०० ऐवजी सात हजार २६० रुपये भरावे लागणार आहेत, तर प्रवेश शुल्कासाठीही ८७० ऐवजी ९६० रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय इतर शुल्कातही पालिकेने दरवाढ प्रस्तावित केली आहे.