कल्याण : येथील सुभेदार वाडा कट्ट्याच्या वतीने व उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, क्रीडा भारती संस्था यांच्या विशेष सहकार्याने शुक्रवारी राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिन साजरा झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनाचे सातत्य असावे तसेच या कार्यक्रमात खंड पडू नये यासाठी येथील शारदा मंदिर हायस्कूल येथे सार्वजनिक सूर्यनमस्कार कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते. याचबरोबर योगशिक्षिका सीमा वेलणकर, एमएमआरडीएचे अधिकारी प्रदीप आहिरे, खान्देश विकास मंडळ अध्यक्ष विकास पाटील, सुभेदार वाडा कट्ट्याचे अध्यक्ष दीपक जोशी व कोषाध्यक्ष ए. जी. पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमात संकेत लिंगायत याने आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट योग प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन करून ५० विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनी सूर्यनमस्कार घातले. या वेळी झूमच्या माध्यमातूनही हा कार्यक्रम यूट्युबवर प्रसारित करण्यात आला. यात ३४३ शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक अंकुर आहेर यांच्यासह इतर शाळेतील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
-----------------------------------------------------
फोटो आहे.