ठाणे : यंदा कोरोनाच्या वातावरणात राखी पौर्णिमेला बहिणीला भावाकडे राखी बांधायला जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता टपालखाते मदतीला पुढे सरसावले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विशेष राखी पाकीट उपलब्ध करण्यात आले आहे. सर्व टपाल कार्यालयांत ते १० रुपये या माफक किमतीला उपलब्ध आहे. या पाकिटामधून भावाला राखी सुरक्षितपणे जाणार आहे. ग्राहकांनी या राखी पाकिटाला पसंती दिली आहे.
ठाणे विभागात सर्व टपाल कार्यालयांत राखी पाकिटांचे बुकिंग करण्यासाठी विशेष काउंटर उघडले आहे. राखी पाकिटे ट्रेमध्ये लगेच वेगळी करून पुढील गंतव्य स्थानाकडे पाठविण्याची व्यवस्था केली आहे. तसेच राखीच्या वितरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही सेवा देण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. प्रवासाकरिता वाहतुकीची व्यवस्थाही उपलब्ध नाही. यामुळे यंदा अशा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे होण्यासाठी टपालखाते पुढे सरसावले आहे. भावापर्यंत राखी पोहोचवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातही विशेष काळजी घेऊन केवळ राखी मेलची डिलिव्हरी सर्व विभागांतील टपाल कार्यालयांत २ आॅगस्ट या सुटीच्या दिवशीही केली जात आहे, असे नवी मुंबई रिजनच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे यांनी सांगितले.शनिवारी बकरी ईदची सुटी व सोमवारी रक्षाबंधन आहे. त्यामुळे जनतेला रक्षाबंधनपूर्वी राखी पाकिटे मिळावेत, यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार रविवारीही ठाणे विभागात डाकसेवकांनी हजर राहून राखी मेल डिलिव्हरी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भावाला घरबसल्या बहिणीची राखी पोहोच करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.