ठाणे: लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्यांनी निवडून येतील, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. तर अजितदादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, अशी भावनिक साद राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या साैभाग्यवती सुनेत्रा पवार यांनी ठाणेकर महिलांना घातली.
ठाण्यात शनिवारी कळव्यातील खारलॅण्ड मैदानात "होम मिनिस्टर - सन्मान महिलांचा, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आयोजन केले होते. त्यावेळी पवार यांनी ही साद महिलांना घातली. आनंद परांजपे व नजीब मुल्ला यांनी होममिनिस्टर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करुन महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले. महिलांनी होममिनिस्टरला दिलेला उदंड प्रतिसाद याची साक्ष आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्यांनी निवडून येतील असा विश्वास तटकरे आणि सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिता गोतपागर, माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, रिटा यादव, वहिदा खान, अंकिता शिंदे, अनिता किणे, उमेश पाटील तसेच जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, राजनाथ यादव, तकी चेऊलकर आदी मान्यवर उपस्थित होते. आदिती पुढे म्हणाल्या, महिलांना घरच्या कामातुन विश्रांती देत मनोरंजन करण्याचे आणि महिलांच्या आयुष्यात दोन क्षण आनंदाचे आणण्याचे महत्वपूर्ण काम होममिनिस्टर कार्यक्रम करीत असतो. यामुळेच त्याची आपल्यासह महिलांमध्ये ख्याती आहे. जसजशा निवडणूका जवळ येतील तसतसे विरोधाकडून महायुतीविरोधात वक्तव्य होतच राहतील. पण ज्या महायुतीच्या उमेदवारांना वरिष्ठ नेतृत्व संधी देतील, त्यांना सर्व मतदार विजयाचा कौल देऊन निवडून देतील, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला. यावेळी सुनेत्रा पवार यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
होममिनिस्टरच्या या कार्यक्रमात पहिले बक्षीस : मानाची पैठणी व सोन्याची नथ खारीगावच्या पूनम पाटील यांनी तर दुसरे बक्षीस : मानाची पैठणी व मोत्याचा तनमणी खारीगाव च्या संध्या दळवी यांनी पटकाविले तर तिसरे बक्षीस : मानाची पैठणी व चांदीचे पैंजण मुंब्रा येथील पूजा भोसले यांनी पटकाविले. यावेळी उत्तेजनार्थ सात बक्षिसांचे वाटप करण्यात आले.