अनिकेत घमंडी
डोंबिवली : ‘मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम’ या कंपनीला मंगळवारी लागलेली आग सुरुवातीला कमी होती. कंपनीतील आगप्रतिबंधक यंत्रणेद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर पाऊ ण तासानंतर त्यांची पहिली गाडी घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या विलंबामुळेच आग वाढल्याचा आरोप या कंपनीचे मालक राजीव सेठ यांनी बुधवारी केला.सेठ म्हणाले की, अग्निशमन दलाची पहिली गाडी आली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र बंबातील पाणीच संपले. त्यामुळे त्यांना पाणी भरण्यासाठी जावे लागले. त्यानंतर दुसरी गाडी आली तरी यंत्रणा कामाला लागण्यासाठी सुमारे २५ मिनिटांचा अवधी लागला. त्यामुळेच आगीने रौद्र रूप धारण केले. कंपनीत सुमारे ५०० हून अधिक कामगार काम करतात. तीन पाळ्यांमध्ये काम चालत असून येथील उत्पादन जपान व इतर देशांमध्ये निर्यात केले जाते. २५ वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या कंपनीत सुरक्षाविषयक सर्व उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. या आगीमध्ये कंपनीचे सुमारे १५० कोटींचे नुकसान झाले.
स्टोअर रूममधील कच्चा माल, साधनसामग्री याबाबतचे रेकॉर्ड तपासण्याचे सध्या काम सुरू आहे. तसेच आगीमागचे कारणही शोधले जात आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरण तपासण्यात येणार आहे. त्यातून नेमके कारण उघड होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीच्या स्टोअर विभागातील कामगाराने सांगितले की, कंपनीच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी वेल्डिंग सुरू होते. काही गडबड होऊ न ही आग लागली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. ‘लोकमत’ने आगीविषयी हाच अंदाज वर्तवण्यात आला होता.आगीची माहिती मिळताच पलावा, एमआयडीसी केंद्रातून अग्निशमनच्या गाड्या, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला जो वेळ लागला तोच. मात्र, अग्निशमनच्या विलंबामुळे आग वाढली, असे म्हणणे चुकीचे आहे. मी स्वत: घटनास्थळी उपस्थित होतो. आमचे अधिकारी, कर्मचारी आग विझवण्यासाठी झटत होते.- दिलीप गुंड, मुख्य अधिकारी, अग्निशमन दल, केडीएमसी