ठाणे : ठाण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एका सहा मजली इमारतीच्या गच्चीवर सोमनाथ सातगीर (३५, रा. कोलशेत, ठाणे) या सुरक्षारक्षकांच्या पर्यवेक्षकाच्या गळ्यावर आणि दोन्ही हातांवर चाकूचे वार करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला. संशयित सुरक्षारक्षक प्रसाद कदम हा पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
ठाण्यातील या इमारतीच्या गच्चीवर सोमनाथ याचे शीर, धडावेगळे केलेल्या अवस्थेत असल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर या इमारतीच्या रहिवाशांमध्ये एकच घबराट पसरली. घटनास्थळी तातडीने परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, कापूरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पिंपळे आणि वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके आदींच्या पथकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी सोमनाथ हा रक्ताच्या थारोळयात पडल्याचे आढळले. त्याच्या डाव्या हाताच्या खांद्यावर चाकूचे तीन ते चार वार होते. तर उजव्या हातावरही वार करुन तो बाजूला केला होता.
गच्चीवरही बऱ्याच ठिकाणी रक्त पसरले होते. या हत्याकांडामुळे घटनास्थळी दाखल झालेले पोलिसही हादरले. तातडीने इमारतीच्या पदाधिकाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. तेंव्हा इमारतींमधील सर्व सीसीटीव्हींचीही चौकशी आणि पडताळणी करण्यात आली. त्यानुसार सोमनाथ हा पर्यवेक्षक आणि लिफ्टमन असलेला दुसरा सुरक्षा रक्षक प्रसाद कदम हे दोघेच रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान या इमारतीच्या गच्चीवर जातांना दिसले. त्यानंतर परत येतांना मात्र प्रसाद हा एकटाच गच्चीवरील पायऱ्यांवरुन येतांना दिसला. त्याचा दिव्यातील घरीही पोलीस पोहोचले. मात्र, तो सापडला नाही. यामुळेच त्याच्यावर प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. तो कुठे गेला? आणि त्यानेच हे कृत्य केले का? कोणत्या कारणांसाठी केले? या सर्व प्रकाराचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या इमारतीवर जाण्याचे मार्ग पोलिसांनी सील केले असून इमारतीमधील रहिवाशांचे जबाब नोंदविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.