ठाणे : ठाण्यात मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे बुधवारी झालेल्या महासभेत उघड झाले. एका महिलेला महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात चिकनगुनियाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तिला या आजारावरील इंजेक्शनच मिळत नसल्याची धक्कादायक बाब सत्ताधारी शिवसेनेने उघड केली. केवळ फार्मासिस्टचे बिल अदा करण्यात न आल्याने संबंधित कंपनीने ते इंजेक्शन न दिल्याचे प्रशासनाने कबूल केले. त्यामुळे औषधांची बिले तत्काळ अदा करून त्या महिलेला इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले.
महासभेत शिवसेनेच्या नगरसेविका मीनल संख्ये यांनी शहरात डेंग्यू आणि इतर आजारांचे रुग्ण किती याची माहिती आरोग्य विभागाला विचारली. रघुनाथनगर भागात एका महिलेला चिकनगुनियाची लागण झाली असून तिला उपचारार्थ महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तिच्या उपचारार्थ लागणारे आयव्हीएलजी ५ एमजीचे इंजेक्शन अद्याप मिळाले नसल्याची माहिती शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी दिली. महिलेला ते इंजेक्शन का दिले जात नाही, याचा जाब त्यांनी विचारला. त्यावर मुख्य वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैयजंती देवगीकर यांनी ज्या फार्मसीकडून हे इंजेक्शन घ्यायचे आहे, त्याचे आधीचे बिल न दिल्याने त्याने इंजेक्शनचा पुरवठा केला नसल्याचे सांगितले. या संदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांच्याकडून महापौर म्हस्के यांनी माहिती घेतली असता, त्यांनीही बिल अदा न केल्याने इंजेक्शन दिले नसल्याचे सांगितले. संबंधितांचे बिल मिळावे यासाठी कॅफोंना सांगण्यात आले असून त्यांनी बिल न काढल्याची माहिती जाधव यांनी दिली.
दरम्यान, महापौर म्हस्के यांनी संबंधित फार्मसीचे पैसे तत्काळ अदा करून इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. गुरुवारी इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढले
शहरात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत असून ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे ३६, डेंग्यूसदृश १३, चिकनगुनिया २ आणि लेप्टोचे २ रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
........