लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील गावखेड्यांमधील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या मिशनद्वारे जून महिन्यापर्यंत २७ हजारपेक्षा अधिक घरांना नळपाणीपुरवठा सुरू केल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.
जिल्ह्यातील गावपाड्यांमधील ग्रामस्थ आजही नदी, नाला आणि विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. या रहिवाशांना मुबलक व स्वच्छ, निर्मळ पाणी मिळवून देण्याचे नियोजन ठाणे जिल्हा परिषदेने केले आहे. यानुसार केंद्र शासनाचे जलजीवन मिशन हाती घेतले. त्याद्वारे लाखो रुपये खर्च करून जून महिन्यापर्यंत २७ हजार ४२० घरांना नळाद्वारे मुबलक, स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात ठाणे जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे. यापैकी डिसेंबर ते मार्चपर्यंत २४ हजार ७५९ घरांना आधी नळजोडणी देण्यात आली आहे. याशिवाय एप्रिलपासून जूनअखेरपर्यंत दोन हजार ६६१ घरांना नळजोडण्या देण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या माध्यमातून नळपाणीपुरवठा योजना हाती घेतल्या होत्या. याअंतर्गत दीर्घ काळापासून अपूर्ण राहिलेल्या ३९ योजना रखडल्या होत्या. यापैकी ३५ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्याद्वारे २७ हजार ४२० घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी अपूर्ण राहिलेल्या ३९ योजनांच्या कामांपैकी ३५ कामे पूर्ण करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील २७ हजार ४२० ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ६१ महसुली गावांना १०० टक्के नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहे.
-----जोड आहे