मुंबई - राज्यात महासत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदेंच्या मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री यांचा शिवसेनेशी संबंध नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर, राज्यातील शिवसेनेत दोन गट पडले असून शिंदे गट उदयास आला आहे. त्यातच, एकनाथ शिंदे शिवसैनिकांना आपलसं करण्यात यशस्वी होत असून स्थानिक नेते आणि पदाधिकारीही शिंदेगटात सामिल होत आहेत. नुकतेच, माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी शिंदेगटात प्रवेश केल्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही शिंदेंचं नेतृत्त्व मान्य केलं आहे.
ठाणे जिल्ह्यातील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज शिंदेगटात सहभागी होत नव्या सरकारला आपला पाठींबा दर्शवला. शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अंतिम प्रमाण मानून तसेच आंनद दिघे यांची शिकवण अंगिकृत करून सुरू केलेल्या वाटचालीत ठाणे जिल्ह्यातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांनी आज युती सरकारला आपला जाहीर पाठिंबा दिल्याचे शिवसेनेतील बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदेंची आज ठाणे जिल्ह्यातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी भेट घेतली. त्यानतंर, त्यांनी आपला पाठिंबा शिंदे गटाला आणि भाजपा-शिवसेना युतीला जाहीर केला.
एकनाथ शिंदेंना पाठींबा दिलेल्या गटांत बदलापूर, अंबरनाथ परिसरातील २५ नगरसेवक, ४ पंचायत समिती सदस्य, १ सभापती आणि १०० हून अधिक पदाधिकारी आहेत. तसेच, शहापूर येथील १० नगरसेवक, ४ पंचायत समिती सदस्य, ५ जिल्हा परिषद सदस्य आणि मुरबाड येथील अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांनी आम्हाला पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच, या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पाठींब्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद वाढल्याचेही शिंदेंनी म्हटले आहे.
दरम्यान, याप्रसंगी ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, शहापूर तालुका संपर्कप्रमुख आकाश सावंत उपस्थित होते.