लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : भाजप प्रदेश नेतृत्वाने नेमलेले जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास यांना आमचा पाठिंबा असल्याचे भाजपतील ज्येष्ठ व जुन्या जाणत्या नगरसेवक, कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे. अनेकांनी व्यास यांची जिल्हा कार्यालयात भेट घेऊन सुमारे दोन तास चर्चा केली. तर माजी आमदार नरेंद्र मेहता हे पक्षनेतृत्व व पक्षशिस्तीला जुमानत नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी बैठकीत केली गेली.
भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांची ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शनिवारी भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते व नगरसेवक रोहिदास पाटील, गजानन भोईर, नगरसेवक मदन सिंह, राजेंद्र मित्तल, डॉ. नयना वसाणी, श्यामराव मदने, बाळू वाघमारे, अजय सिंह, गजानन नागे, महेश म्हात्रे, प्रदृमन शुक्ल, हेमंत सिंह, शंशिकात पांडे, रमनलता गोस्वामी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मीरा भाईदरकरांना भ्रष्टाचार - भय मुक्त शहर करणे, भूमिपुत्रांना न्याय देणे, माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या एकाधिकारशाहीला विरोध करणे आदी मुद्द्यांवर ज्येष्ठांनी परखड मत मांडल्याचे नागे यांनी सांगितले. अनेक जुने कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर अन्याय केल्याच्या व्यथाही बैठकीत काहींनी मांडल्या. जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या. मीरा भाईंदर व भाजप परिवार वाचवा असे आवाहनही काहींनी केले. मेहता व त्यांच्या समर्थकांवर पक्षशिस्तभंग कारवाईची मागणी या बैठकीत करण्यात आली. पक्ष नेतृत्वास तसे निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असे नागे म्हणाले.