डोंबिवली : धनश्री गोडवे या तरुणीचा धावत्या लोकलमधून पडून सोमवारी अपघाती मृत्यू झाला. त्या आधी भावेश नकाते या डोंबिवलीच्याच युवकाचा आणि कांबळे यांचाही रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता. मध्य रेल्वे प्रशासनावर नकातेसह कांबळेंच्या घटनेनंतर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. त्यावेळी व्हॉट्सअॅपवरील तो व्हिडीओ व्हायरला झाल्याने आणि ‘लोकमत’सह प्रसिद्धी माध्यमांनी तो विषय उचलून धरल्याने दिल्ली दरबारी त्याबाबतची विचारणा झाली होती. मात्र तरीही अशा घटनांवर आळा बसलेला नाही. त्यासाठी प्रवासी संघटना बुधवारी जो मूक निषेध करणार आहेत, त्याला सर्वपक्षिय नेत्यांनी पाठींबा दिला आहे.मंगळवारी ‘लोकमत’मध्ये या अपघातासह धनश्रीच्या वडीलांची खंत आणि उपनगरिय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या वतीने जे आंदोलन करण्यात येणार आहे त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याला भाजपसह मनसेने आधीच पाठींबा दिला. त्याची दखल घेऊन शिवसेनेनेही या निषेध सभेला पाठींबा जाहिर केला. बुधवारच्या निषेध सभेला आमदार रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम, शहर प्रमुख भाऊ चौधरी, भाजपचे शशिकांत कांबळे, नगरसेवक आदींसह पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ठिकठिकाणच्या प्रवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होणार आहेत. रामनगर तिकिट खिडकीसमोरील जागेत ही सभा स. ९ वा. होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी सांगितले.
रेल्वेविरोधात मूक निषेधाला पाठिंबा
By admin | Published: February 03, 2016 2:08 AM