- प्रज्ञा म्हात्रेठाणे - मानसिक आजारावर उपचार घेत असताना त्या महिलेला क्षयरोगाने ग्रासले. हळूहळू ती अंथरुणाला खिळू लागली, तिला मणक्याचा क्षयरोग असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तिच्या कुटुंबियांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी जबाबदारी झटकल्याने तिला बरे करण्याचे धनुष्यबाण हाती घेऊन या आजाराच्या खर्चाचा सर्व भार ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने उचलून माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले.नातेवाईक जबाबादारी झटकत असताना या महिला मनोरुग्णाच्या मागे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय खंबीरपणे उभे राहिले. तिची स्पाईन सर्जरी यशस्वी झाली आता तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत. परंतु, तिच्या कुटुंबियांना वारंवार संपर्क करूनही अद्याप तिला भेटायला कोणीही आलेले नाही. तिचे डोळे मात्र, आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी वाट पाहत आहेत.मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या कल्याण येथील ३५ वर्षीय विवाहीत महिलेली तिच्या पतीने उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिच्या पतीने तिची एकदा भेट घेतली तो नंतर फिरकलाच नाही, वडिल मात्र अधून मधून भेटायला येत असत. दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी या महिलेला क्षयरोग झाल्याचे आढळून आले. या आजाराची कल्पना देण्यासाठी मनोरुग्णालयातून तिच्या पतीला फोन लावला, त्याने फोन पहिल्यांदा उचलला नंतर तो टाळटाळ करू लागला आणि शेवटी फोन घेणे बंद केले. वडिलांना फोन केला त्यांनी तिची जबाबदारी तिच्या पतीचे असल्याचे सांगून हात झटकले. सासूनेही हात वर केले, पोलिसांना संपर्क केल्यावर त्यांनाही त्यांच्या कुटुंबानीही सारखेच उत्तर दिले. एकीकडे मनोरुग्णालय तिच्या कुटुंबाला वारंवार संपर्क करीत होते दुसरीकडे ही महिला क्षयरोगाने अंथरुणाला खिळू लागली. कुटुंब दाद देत नाही हे लक्षात आल्यावर आणि शेवटी तिची परिस्थीती खालावत असताना या महिलेला बरे करण्याची जबाबदारी प्रादेशिक मनोरुग्णालयाने स्वीकारली. सुरुवातीला तिच्या चाचण्या केल्या, तिला मणक्याचा क्षयरोग असल्याचे निदर्शनास आले. केईम रुग्णालयात तिला या शस्त्रक्रियेसाठी दाखल केले आणि तेथील डॉक्टरांनी तिच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली. तिच्या औषधपाण्याचा खर्च प्रादेशिक मनोरुग्णालय करीत होते. ती मनोरुग्णालयात आली आहे, अजूनही तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत. तोही खर्च मनोरुग्णालय करीत आहे.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची माणुसकी, क्षयरोगग्रस्त महिलेला दिला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 6:33 AM