भिवंडी : विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभरापासून सुरू असलेल्या राज्यातील सत्ता स्थापनेच्या पेचाचे पडसाद सोमवारी भिवंडीत उमटले. मुंबईतील मानखुर्द येथील समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेशी हातमिळवणी केल्याच्या निषेधार्थ भिवंडीतील कार्यकर्त्यांनी आझमी व शेख यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळून जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला समाजवादी पक्षाने समर्थन दिल्याने भिवंडी शहरातील नवी वस्ती परिसरात आमदार शेख व आझमी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चपलाचे हार घालून पेटवून देण्यात आले.आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी भाजप-शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी मुस्लिम मतदारांची मते घेतली. मात्र, आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार शिवसेनेसोबत गेल्याने या आमदारांनी मतदारांची फसवणूक केली आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही हे पुतळे जाळत आहोत.
शिवसेनेला पाठिंबा दिल्याने आमदारांचे पुतळे जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 1:46 AM