ठाणे : साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे अतिशय लाजिरवाणे असून एखाद्या योद्धयाबद्दल असे वक्तव्य करणे, हा देशाचा आणि संपूर्ण महाराष्टÑाचा अपमान आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाने त्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांनी उमेदवारीचे बक्षीस देणे, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी ठाण्यात व्यक्त केले.राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ ठाण्यातील एका सभागृहात आयोजित महिला मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न युती सरकारकडून सुरूअसून काँग्रेस, राष्टÑवादी पक्ष मराठी शाळा केव्हाही बंद पडू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डान्स बारबंदी हटवावी, अशी कोणीही मागणी केली नव्हती. मात्र, या मंडळींनी ही बंदी उठवून काय साधले, असा सवालही त्यांनी केला. ज्या योद्धयामुळे आपण सुरक्षित आहोत, अशांबद्दल साध्वींनी बेताल वक्तव्य करणे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे या महिलेला साध्वी म्हणावे का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मागील पाच वर्षांत विकासाची कोणतीच कामे सत्ताधाऱ्यांकडून झालेली नाहीत. स्मार्ट सिटीचा प्रकल्प संपूर्ण देशात फसला आहे. स्टार्टअप, डिजिटल इंडिया यासारख्या योजनाही फसल्या आहेत. विकासाचे मुद्दे घेऊन कुठेही भाजपकडून प्रचार होताना दिसत नाही.उमेदवारीसाठी पंतप्रधानांचे शक्तिप्रदर्शन ही दुर्दैवी बाबउमेदवारी अर्ज भरण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना शक्तिप्रदर्शन करावे लागते, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठलीच नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीवर बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने ते अशा पद्धतीने वक्तव्य करत आहेत. त्यांनी आपण ज्या खुर्चीवर बसलो आहोत, त्याचा किमान मान राखावा, असेही वाटते. राज्यात आज पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत आहे. परंतु, यावर युतीकडून काहीच बोलले जात नसल्याचेही त्या म्हणाल्या.
शहिदाबद्दल बेताल वक्तव्य करणे हा देशाचा अपमान- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 1:52 AM