लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: महाराष्ट्रात सर्वप्रथम लॉयर्स अकॅडमी सुरू करण्याबाबत चर्चा झाली. परंतु ही चर्चा दुसऱ्या राज्यांनी ऐकली आणि गुजरातने पहिली लॉयर्स अकॅडमी सुरू केली. प्रत्येक बाबतीत गुजरातच पुढे का असावा, महाराष्ट्रानेसुद्धा पुढे असलं पाहिजे, असे सांगत महाराष्ट्रात लॉयर्स अकॅडमी उघडण्यासाठी शासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी बुधवारी येथे केले.
भिवंडी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन न्यायमूर्ती ओक यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. न्यायालयातील न्यायदान कक्षाचे उद्घाटन करीत असताना न्या. ओक यांनी तो बहुमान शशिकांत शंकर उत्तेकर या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यास दिला. त्यामुळे न्यायालयातील कर्मचारी भावनिक झाले. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, शर्मिला देशमुख, गौरी गोडसे, जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री, भिवंडी न्यायालयाचे न्यायाधीश शहजाद परवेज, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य जयंत जायभाने, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद थोबडे, ज्येष्ठ सल्लागार गजानन चव्हाण व भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष मंजित राऊत व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडी न्यायालयातील बार असोसिएशनच्या ई- लायब्ररीसाठी दहा लाख रुपयांचा खासदार निधी देण्याची घोषणा केली, तर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी न्यायव्यवस्थेसाठी सोयी-सुविधा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन दिले.
ठाणे जिल्हा महत्त्वाचा
मुंबई उच्च न्यायालयात सहा न्यायाधीश हे ठाणे जिल्ह्यातील असताना ठाणे न्यायालयाच्या इमारतीचे काम आजही रखडलेले आहे, ही शोकांतिका आहे, पुढच्या वर्षीच्या विजयादशमीला ठाणे न्यायालयाची दहा मजली भव्य न्यायालय इमारत व लॉयर्स अकॅडमीचे उद्घाटन व्हावे, अशी अपेक्षा ओक यांनी व्यक्त केली.