ठाणे : बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी तथा काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घर आणि कार्यालयावर ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने छापासत्र राबवले. एकाच वेळी १० ठिकाणी टाकलेल्या छाप्यात विक्रांत यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि काही कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. २०१२ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालावधीत ज्ञात उत्पन्नापेक्षा १३६.२७ टक्के अधिक म्हणजे सुमारे अडीच कोटी जादा मालमत्ता आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांच्यासह नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण आदी चार नगरसेवकांविरुद्ध आॅक्टोबर २०१५ मध्ये सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलेले आहे. याच गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त परमवीर सिंग, गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलीस आयुक्त अविनाश मोहिते, विशेष तपास पथकाचे (एसआयटी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्याकडून सुरू आहे. याच पथकाने गेल्या दीड वर्षात केलेल्या चौकशीत विक्रांत चव्हाण आणि त्याची पत्नी अरुणा यांनी एप्रिल २०१२ ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीमध्ये आपल्या उत्पन्नापेक्षा १३६.२७ टक्के अपसंपदा संपादित केल्याचे आढळले. त्यासाठी विक्रांत याची पत्नी अरुणा यांना त्यांचे सासरे रवींद्रन नायर, सासू शांता नायर, कार्यकर्ते उमेश कांबळे, संतोष गावडे, प्रकाश भोसले, भास्कर गडामी, अनंत घाडगे, महेश शिर्के, परेश रोहित आणि कल्पतरू प्रॉपर्टीजचे उपाध्यक्ष संजय डागा यांनी मदत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. गुन्हा दाखल होताच वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण यांच्या मानपाडा येथील हॅपी व्हॅली येथील पाचव्या मजल्यावरील ५०३ आणि ५०४ या सदनिकांमध्ये, सासरे रवींद्रन नायर यांच्या टिकुजिनीवाडीतील कल्पतरू हिल्स तसेच वर्तकनगर भागातील विनायक सोसायटीतील विक्रांत याच्या बंद घरातही ही झाडाझडती घेण्यात आली. याशिवाय, वर्तकनगर भागातीलच उमेश कांबळे, संतोष गावडे, भास्कर गडामी, प्रकाश भोसले, अनंत घाडगे, महेश शिर्के आणि परेश रोहित या कार्यकर्त्यांच्या घरातही हे धाडसत्र राबवण्यात आले. याव्यतिरिक्त कल्पतरू प्रॉपर्टीजचे उपाध्यक्ष संजय डागा यांच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅ्रण्ट हयात हॉटेलसमोरील कार्यालयातही ठाणे पोलिसांनी धाडसत्र राबवले.विक्र ांत चव्हाण यांच्या मालकीचा वर्तकनगरच्या विनायक सोसायटीमध्ये २३ लाखांचा फ्लॅट, शुभंकर सोसायटीमध्ये ४० लाख २५ हजारांचा फ्लॅट, मँचेस्टर बिल्डींगमध्ये २४ लाख २० हजारांचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे या गावी विक्र ांत यांनी ५६ लाख रु पयांचा दुमजली बंगला आहे.
सुरज परमार आत्महत्या : विक्रांत चव्हाण यांच्या घर, कार्यालयांवर छापे, तीन वर्षांत अडीच कोटींची मालमत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 1:46 AM