ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर होऊन तब्बल १७ दिवस उलटले, तरी सुरेश टावरे यांना पक्षाने ‘ए’ व ‘बी’ फॉर्म दिले नसल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. टावरे हे फॉर्म मिळवण्याच्या खटपटीत दिवसभर होते, तर त्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असून तोपर्यंत टावरे यांना ‘ए’ व ‘बी’ फॉर्म दिले गेले, तरी या सावळ्या गोंधळाचे परिणाम दूरगामी होण्याची चिन्हे काँग्रेसचे नेते खासगीत मान्य करत आहेत. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात अखेरच्या क्षणी सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार किंवा कसे, याचे गूढ कायम आहे.
भाजपचे कपिल पाटील हे युतीचे मेळावे घेऊन प्रचार करत असताना भिवंडी मतदारसंघात काँग्रेसचे घोडे अद्यापही उमेदवार निश्चितीवरच अडले असल्याचे दिसत आहे. काँग्रेसने टावरे यांना उमेदवारी जाहीर केली असली, तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मंगळवारच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या हाती ‘ए’ व ‘बी’ फॉर्म दिले नव्हते. त्यामुळे काँग्रेस टावरे यांची उमेदवारी रद्द करून ऐनवेळी उमेदवार बदलणार का? काँग्रेसमध्ये प्रवेश करून सुरेश म्हात्रे उमेदवारी पदरात पाडून घेणार का? अशा तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळत नाही. सुरेश म्हात्रे यांचे दिल्लीच्या पातळीवर काँग्रेसचे ए व बी फॉर्म मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणांपर्यंत प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.
कदाचित, रात्री उशिरापर्यंत हा घोळ मिटून टावरे यांनाच ए व बी फॉर्म मिळतील. मात्र, काँग्रेसमधील या घोळाचे परिणाम प्रचारात पण दिसतील, अशी भीती काँग्रेसचेच नेते खासगीत व्यक्त करत आहेत.भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुरेश टावरे यांना दि. २२ मार्च रोजी उमेदवारी जाहीर झाली. परंतु, त्यानंतर घडलेल्या विविध घटनामुंळे टावरे यांच्या हाती अद्यापही ए व बी फॉर्म पडलेले नाही. भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी द्यावी, असे पत्र काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींना दिले होते. परंतु, त्यांच्या पत्राची दखल घेतली न गेल्याने त्यांनी याविरोधात आवाज उठवला होता. म्हात्रे यांनी थेट दिल्लीतून तिकिटासाठी लॉबिंग सुरू ठेवल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली.
आज निर्णय होण्याची शक्यता यांचा पत्ता कापून म्हात्रे यांना उमेदवारी मिळेल, अशा पोस्ट सोशल मीडियावर रविवारी दिवसभर फिरत होत्या. मात्र, काँग्रेसकडून ना टावरे यांना ए व बी फॉर्म दिले जात, ना म्हात्रे यांच्या उमेदवारीचा साफ इन्कार केला जात.