ठाणे : लहान मुलांच्या हृदयात असणारे छिद्र किंवा इतर तत्सम आजारांमुळे त्यांच्यावर कॉन्जिनिटल हार्ट सर्जरी करावी लागते. दरहजारी मुलांमागे किमान ८ ते १० मुलांना हा त्रास होतो आणि त्याचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो, हेच लक्षात घेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील काही मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी रोटरी ठाणे प्रीमिअम क्लब, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ आणि एका खाजगी हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या या हृदयविकाराचा त्यांना त्रास जाणवू लागल्यावर आणि त्याचे निदान झाल्यावर अधिकाधिक मुलांवर तत्काळ शस्त्रक्रिया करावी लागते. त्यातही ८० टक्के मुलांचा हा आजार शस्त्रक्रियेने पूर्णपणे बरा होतो. मात्र, सुमारे २० टक्के मुलांवर पुन्हा शस्त्रक्रियेची गरज भासते, असे हृदयविकारतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास यांनी सांगितले. जन्मजात मुलांपासून ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये हा आजार आढळतो. जोरजोरात श्वासोच्छ्वास घेणे, वजन न वाढणे अशी लक्षणे जन्मजात मुलांत, तर श्वासोच्छ्वासाबरोबरच वारंवार बेशुद्ध पडणे, डोळे, पायांवर येणारी सूज अशी लक्षणे मोठ्या मुलांमध्ये आढळतात. वयोगट कोणताही असला तरी शस्त्रक्रिया केली जाते. अगदी कमीतकमी वय असलेल्या म्हणजे १५ मिनिटांच्या बाळावर आम्ही ही शस्त्रक्रिया केलेली आहे, असे डॉ. श्रीनिवासन यांनी सांगितले. मुळातच २०११ पर्यंत या आजाराचे विशेषज्ञ नव्हते. त्यानंतर याचे विशेषज्ञ तयार होऊन शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. या शस्त्रक्रियेसाठी साधारण १ ते ५ लाख इतका खर्च येतो. मात्र, तो सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. त्यामुळे बहुतांशी पालक मुलांच्या हृदयाशी निगडित या आजारावरील शस्त्रक्रिया सुरुवातीच्या काळात करण्यास टाळाटाळ करतात, असेही श्रीनिवास यांनी सांगितले.हृदयविकाराने ग्रस्त परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या ७६ मुलांना रोटरीने ३ वर्षांत मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत. या उपक्रमांतर्गत रोटरी ठाणे प्रीमिअम क्लब, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ आणि एका मोठ्या खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून दरवर्षी किमान ५० मुलांच्या शस्त्रक्रिया मोफत करणार आहेत. तो सहमती करार गुरुवारी झाला. त्यावर रोटरी ठाणे प्रीमिअम क्लबचे अध्यक्ष समीर शिंदे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कोळवेकर आणि खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी हृदयविकारतज्ज्ञ डॉ. आशुतोष सिंग, रोटरीअन डॉ. लक्ष्मीकांत कासट होते. (प्रतिनिधी)शस्त्रक्रियेनंतर या मुलांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठीही आर्थिक मदत करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. यावेळी हृदयविकारतज्ज्ञ डॉ. आशुतोष सिंग, रोटरीअन डॉ.लक्ष्मीकांत कासट उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर या मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठीही आर्थिक मदत करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
हजारांमागे १० मुलांवर शस्त्रक्रिया
By admin | Published: May 05, 2017 5:41 AM