ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे. म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता उपचार करून घ्यावेत, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. कोरोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. वेळेत योग्य उपचार घेतल्यास म्युकरमायकोसिस पूर्ण बरा करू शकतो. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने हे शक्य करून दाखविले आहे. पाच म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आहे.
ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयाकडून म्युकरमायकोसिसचे हे पाच रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पाठविले होते. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने तत्काळ या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जून ते ऑगस्टमध्ये दाेन रुग्णांवर, तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत तीन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. योग्य उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत. म्युकरमायकोसिसच्या उपचार पद्धतीसाठी डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ज्ञ अशा डॉक्टरांच्या एकत्रित टीमने या सर्व शस्त्रक्रिया केल्या. यामध्ये मेडिसिन विभागाचे डॉ. योगेश शर्मा, डॉ. सुमन राठोड, शस्त्रक्रिया विभागाच्या डॉ. श्वेता बाविस्कर, तसेच डॉ. अमोल खळे या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.