ठाणे : मकर संक्रांतीचे औचित्य साधत रविवारी संक्रांतसंध्या गोड करण्यासाठी ३५९ क्रमांकाच्या कट्टयावर संगीत लहरी या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ईश्वराच्या आराधने नंतर आशिष साबळे आणि त्यांच्या पत्नी स्मिता साबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडले. अभिनय कट्ट्याचे अध्यक्ष दिग्दर्शक किरण नाकती यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना आशिष साबळे यांचं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर मांडले.
यानंतर लागलीच कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. संगीत लहरी - स्पंदनांकडून चेतनेकडे या विषयाला धरून सुरमणी आशिष साबळे यांनी शास्त्रीय संगीत सादर केले. हा केवळ गायनाचा कार्यक्रम नसून शास्त्रीय संगीतातील सामर्थ्य, गोडवा आणि खोली हि सर्वांना आनंद आणि मानसिक शांती देणारी आहे हे आशिष साबळे यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले. गेल्या २० वर्षापासून आग्रा घराण्यातील उस्ताद मोहसीन अहमद खान यांच्याकडून ते शास्त्रीय संगीत शिकत आहेत. केवळ आवड म्हणून जोपासलेला छंद आणि त्यासाठी आवश्यक असलेला रियाज गेल्या २० वर्षापासून ते नियमितपणे करीत आहेत. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, नव्याने उलगडलेले विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधून या कार्यक्रमाची प्रस्तुती त्यांनी केली. गायक आशिष साबळे यांच्या मतानुसार प्रत्येक जीवात एक सूर असतो आणि त्या सुरांवर संस्कार होणे हे सदैव आनंदी राहण्यासाठी गरजेचे असते. संगीताचे संस्कार हे फक्त याच जन्मासाठी नसून जन्मजन्मासाठी असतात, आणि अशा संस्काराअभावी असू-या प्रवृत्ती जन्म घेतात. आपल्या मधील सूर बळकट केले तर आत्मबळ हि वाढेल आणि आपल्यात दिसणारी अशांती हि नाहीशी होईल असा आशावाद हि त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सुरांवरची बळकटी असलेले यमन, मालकंस, भोपाली असे खास आग्रा शैलीची गायकी प्रधान असलेले राग आणि त्यावरील भजने त्यांनी सादर केली. यावेळी त्यांना अशोक शिंदे यांनी तबल्यावर तर विनोद पडगे यांनी हार्मोनियम वर साथ दिली. संक्रांति निमित्त सादर झालेल्या या कार्यक्रमात गोड बोलण्याचा व पवित्र भावनेचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो हे समजावून सांगत असताना जपान येथील मासरू ईमिटो या शास्त्रज्ञाने केलेल्या प्रयोगाचा पुरावा दिला. या प्रयोगाने भारतीय संस्कृतीमध्ये असलेले संस्कार प्रकृतीशी किती जुळलेले आहेत या बद्दलचा रसिकांच्या मनातील विश्वास अधिकच दृढ केला. शेवटी मनुष्य जन्म दुर्लभ असून जगात शांतता प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य हे फक्त मनुष्य जीवात आहे आणि त्यामुळेच प्रकृतीने मनुष्याला जन्माला घातले हा आशय ठामपणे सांगणा-या “ धन्य भाग सेवा का अवसर पाया” यातील संदर्भ आणि अर्थ समजावून देत त्यांनी भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. सदर कट्ट्याच्या निवेदनाची धुरा अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांभाळली होती. कार्यक्रमाअंती आशिष साबळे आणि त्यांच्या साथीदारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या नंतर सर्व प्रेक्षकांना तिळाचे लाडू व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत कट्ट्याच्या पुढील कार्यक्रमाला सुद्धा याच संख्येने उपस्थित राहून आनंद लुटण्याचे आवाहन अध्यक्ष किरण नाकती यांनी करत कार्यक्रमाची सांगता केली.