डोंबिवली : जूनप्रमाणेच आताही जास्त रकमेची वीज बिले आल्याने, त्याचबरोबर बिले भरण्याकरिता तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने संतापलेल्या ग्राहकांनी महावितरणच्या उपअभियंत्यांना मंगळवारी घेराव घालून जाब विचारला.
भरमसाट वीजबिलांनी आधीच ग्राहक हैराण असताना इतक्या जास्त रकमेचे बिल कशामुळे आले हे समजून घेण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात रांगेत उभे राहावे लागत आहे. तेथील कामकाज संथगतीने सुरू असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. अखेरीस त्रस्त ग्राहकांनी त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी उपअभियंत्यांच्या दालनात धाव घेतली व त्यांना घेराव घातला. तेथे बराच गोंधळ झाल्यावर उपअभियंत्यांनी एकेकाने बोलावे, अशी विनंती केली. त्यानंतर उपअभियंत्यांनी ग्राहकांच्या तक्रारींना उत्तर दिल्यावर ग्राहक शांत झाले.
ग्राहकांना वीज बिले जास्त का आली, याची माहिती एक खिडकी योजनेद्वारे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून देण्यात येत आहे, पण त्यात प्रत्येक ग्राहकाची बाजू समजून घेत त्यांच्या शंकेचे निरसन करण्यात काही वेळ लागत होता. त्यामुळे काही ग्राहक संतापले, विचारणा करण्यासाठी ते थेट दालनात आले. काही वेळात समस्या सुटली.- नितीन ढोकणे, उपअभियंता, महावितरण, एमआयडीसी कार्यालय, डोंबिवली