अजित मांडके, ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने शहर स्मार्ट करण्याचा विडा उचलला असताना त्याचाच एक भाग म्हणून हाऊसिंग फॉर आॅल योजनेच्या माध्यमातून शहरातील झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने शहरातील झोपड्यांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांत तो पूर्ण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. पुनर्विकासाच्या पायलट प्रोजेक्टसाठी एका झोपडपट्टीची निवड केली जाईल. ती झोपडपट्टी कोणती असेल, कोणत्या प्रभागातील असेल, याबाबत आतापासूनच उत्सुकता वाढली आहे.केंद्र व राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे - हाऊसिंग फॉल आॅल या योजनेंतर्गत अॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी, त्याअंतर्गत खाजगी-लोकसहभागातून गृहनिर्माण प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. हा प्लॅन तयार करण्यासाठी केंद्र शासन व राज्य सरकारकडून ३५ लाखांचे अनुदान पालिकेला मिळणार आहे. त्यानुसार, सल्लागाराच्या माध्यमातून संपूर्ण शहरासाठीचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यात संपूर्ण शहरात किती झोपड्या आहेत, त्यात किती कुटुंबे राहतात, याची माहिती गोळा केली जाईल. त्यानंतर, संपूर्ण शहराचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. यात शहरातील झोपड्यांचा कशा पद्धतीने विकास केला जाऊ शकतो, कोणत्या माध्यमातून केला जाऊ शकतो, कोणत्या नियोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास केल्यास योग्य ठरेल, किती घरांची आवश्यकता भासेल, पुनर्विकासासाठी किती घरांची बांधणी करावी लागेल. त्या ठिकाणी असलेली लोकसंख्या, घरांच्या बांधणीसाठी येणारा एकूण खर्च, त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधा आणि सध्या हे क्षेत्र कसे आहे, याचा समावेश त्यात असेल.
पुनर्विकासासाठी ठाण्यातील झोपड्यांचा होणार सर्व्हे
By admin | Published: January 08, 2016 2:02 AM